Veen Doghatli Hi Tutena upcoming twist: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत सध्या समर आणि स्वानंदीच्या लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळत आहे. समर आणि स्वानंदी यांचे लग्न गोव्यात पार पडत असल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सर्वजण या लग्नासाठी उत्सुक असले तरी मल्लिका आणि तिचा मुलगा अंशुमनला हे लग्न झालेले नको आहे. त्यामुळे, ते सतत कारस्थान करताना दिसतात.

याचदरम्यान, मल्लिकाने स्वानंदीच्या आईचा लोभी स्वभाव ओळखून तिला राजवाडे घराण्याच्या बांगड्या दिल्या आणि तिला असाही सल्ला दिला की या बांगड्या गहाण ठेवून पैसे घ्या. तसेच तिने मंदाकिनीला हे आश्वासन दिले की याबाबत ती कोणालाही सांगणार नाही. मंदाकिनीने मल्लिकाने सांगितल्याप्रमाणे बांगड्या गहाण ठेवून पैसे आणले आणि स्वानंदीला खोट्या बांगड्या दिल्या.

मात्र, हे पैसे सुश्मिताने न सांगता नेले. त्यामुळे मंदाकिनीला ते पैसेच नाहीत. आता या सगळ्याबद्दल भर लग्नात खुलासा झाला. स्वानंदी व तिच्या कुटुंबियांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. समरच्या आजीला धक्का बसला. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये इतके सगळे झाल्यानंतरही समर आणि स्वानंदी सर्वांच्या साक्षीने लग्नगाठ बांधत असल्याचे दिसत आहेत.

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की स्वानंदी व समर सप्तपदी घेत आहे. त्यावेळी ते या लग्नाबद्दल मनातल्या मनात काही गोष्टी बोलत असल्याचे दिसत आहे.

प्रोमोच्या सुरुवातीला, समरने पुढे केलेल्या हातात स्वानंदी तिचा हात ठेवते. समर म्हणतो, “हा संसार नाही, ही तडजोड आहे.” त्यानंतर स्वानंदी म्हणते, “ही तडजोड असली तरी माझ्यापरीने संसारासाठी मी जे काही करता येईल, ते सगळं करेन.” पुढे समर म्हणतो, “यांनी इतका त्रास दिला आहे की तो आयुष्यभर विसरू शकत नाही”, स्वानंदी म्हणते, “पण, इथून पुढे कुठलाही त्रास होणार नाही, याची नक्की काळजी घेईन.” समर म्हणतो, “यांच्याकडून सहकार्याच्या अपेक्षा करणंच चुकीचे आहे. फक्त भांडता येतं.” स्वानंदी म्हणते, “मी सहकार्य करण्याचा नक्की प्रयत्न करेन.”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “कसा होणार तडजोडीने झालेल्या लग्नाचा प्रेमापर्यंतचा प्रवास?”,अशी कॅप्शन दिली आहे.

दरम्यान, आता मालिकेत काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.