Veen Doghatli Hi Tutena Upcoming Twist:  ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

या मालिकेतील स्वानंदी व समर हे त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे लक्ष वेधून घेत असतात. स्वानंदी ही मध्यमवर्गीय कुटुंबातील समजूतदार, प्रेमळ, भावावर खूप प्रेम असणारी, वडिलांप्रती आदर असणारी अशी आहे. तसेच, लहान भावाच्या प्रेमाला पाठिंबा देणारी अशी आहे.
तर समरदेखील त्याच्या संपूर्ण कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा, तसेच बहीण अधिराला जपणारा, तिच्यासाठी काहीही करायला तयार असणारा असा आहे.

स्वानंदी व समर पुन्हा समोरासमोर येणार

समर त्याच्या कुटुंबावर डोळे झाकून विश्वास ठेवत असला तरी त्याची काकू, इतर कुटुंबीय त्याच्या विश्वासाचा वेळोवेळी गैरफायदा घेताना दिसतात. आता समर व स्वानंदी याआधी एकमेकांसमोर आले, तेव्हा त्यांची विविध कारणांवरून सतत भांडणे झाल्याचे पाहायला मिळाले. स्वानंदीच्या आईने समर श्रीमंत असल्याचे पाहून त्याच्याकडून पैसे मिळवण्यासाठी त्याच्यावर अपघाताचा खोटा आरोप केला होता. त्यानंतर समरने रागाने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते, तर वृद्धाश्रमाच्या जमिनीमुळेदेखील स्वानंदी व समर यांच्यात वाद झाले होते.

या सगळ्यात मात्र समरची बहीण अधिरा व स्वानंदीचा भाऊ रोहन एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. त्यांच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी ही दोन्ही कुटुंबे एकत्र येणार आहेत. एकमेकांना समोर बघितल्यानंतर स्वानंदी व समर या दोघांनाही धक्का बसणार आहे.

झी मराठी वाहिनीने ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते, “अधिरा स्वानंदीला समरची ओळख करून देते. ती म्हणते हा माझा पिंट्या दादा”, समरला पाहून स्वानंदी तुम्ही, असे आश्चर्याने म्हणते; तर समरदेखील रोहनला विचारतो की या तुझ्या नंदू ताई? त्यावर रोहन हो म्हणतो.

समर व स्वानंदी बाजूला जातात. समर म्हणतो की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तो स्वानंदीला म्हणतो, मी आता समजूतदारपणे वागायचं ठरवलं आहे. अधिराला आणि रोहनला आपल्या वादाबद्दल काहीही कळू द्यायचं नाही. त्यावर स्वानंदी त्याला म्हणते की हे तुम्हाला मला सांगायची गरज नाही, असे म्हणून ती निघून जाते.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “पिंट्या दादा आणि नंदू ताईमधील गैरसमजाची वीण आता तरी दूर होईल का?”, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.