Telugu Film Industry Workers Strike : तेलुगू चित्रपटसृष्टीबद्दल एक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे इंडस्ट्रीतील कामगारांनी आज (४ ऑगस्ट, सोमवार) पासून कामबंद संप पुकारला आहे. तेलुगू फिल्म कर्मचारी संघाने (Telugu Film Employees Federation) वेतनवाढीच्या जुन्या मागणीसंदर्भात संपाची घोषणा केली आहे.

फ्रीप्रेसजर्नलच्या वृत्तानुसार, महासंघ, तेलुगू फिल्म प्रोड्यूसर्स कौन्सिल आणि तेलुगू फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यात अनेकदा चर्चा होऊनही काहीच तोडगा न निघाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहेत मागण्या?

महासंघाने तेलुगू चित्रपटसृष्टीतील कामगारांच्या रोजंदारीत ३० टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे. ही मागणी गेल्या काही महिन्यांपासून दुर्लक्षित केली जात होती. महासंघात २४ वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपट कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या मते, गेल्या तीन वर्षांपासून रोजंदारीत कोणतीही वाढ झालेली नाही आणि त्यामुळे १०,००० हून अधिक कामगारांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे.

संघाचे माजी सरचिटणीस राजेश्वर रेड्डी काय म्हणाले?

संघाचे माजी सरचिटणीस राजेश्वर रेड्डी यांनी रविवारी सांगितले की, “आमच्या कार्यकारिणीच्या निर्णयानुसार, सर्व कामगार (४ ऑगस्ट) सोमवारपासून कामावर येणार नाहीत. अनेकदा झालेल्या चर्चांनंतरही निर्माते वेतनवाढीस तयार नाहीत.” रेड्डी यांच्या मते, चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कामगारांना सध्या रोज १,४०० रुपये मिळतात. ही रक्कम तीन वर्षांपासून वाढलेली नाही, त्यामुळे ३०% वाढ ही गरजेची आहे.

याबद्दल रेड्डी पुढे म्हणाले की, “चित्रपटात १५० ते २०० रोजंदारीवरील कामगार काम करतात. मोठे दिग्दर्शक, एडिटर्स, सिनेमॅटोग्राफर्स आणि स्टंट आर्टिस्ट स्वतःचा मोबदला थेट निर्मात्यांशी ठरवतात. पण साध्या कामगारांची स्थिती मात्र वाईट आहे. निर्माते कोट्यवधी रुपये मोठ्या कलाकार आणि तंत्रज्ञांवर खर्च करतात; पण खालच्या स्तरावर काम करणाऱ्या कामगारांची वेतनवाढ करायला ते टाळाटाळ करतात.”

इतर मागण्या काय आहेत?

१. कामगारांना दररोज वेतन मिळावे.
२. उशीराने देण्यात येणारे पैसे थांबवावेत.
३. जेव्हा मागण्या मान्य होतील; तेव्हाच काम सुरू होईल.
४. वेतनवढीबाबत निर्मात्यांकडून लिखित आश्वासन मिळावं.

यावर निर्मात्यांची प्रतिक्रिया काय?

तेलगू फिल्म प्रोड्यूसर्स कौन्सिल आणि चेंबर ऑफ कॉमर्सने फक्त ५% वेतनवाढीचा प्रस्ताव दिला होता, मात्र महासंघाने तो थेट नाकारला आहे. यामुळे अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट आणि वेबसीरिज ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.

दरम्यान, कामगारांचा संप हा केवळ वेतनवाढीसाठीच नाही, तर स्वाभिमान, सन्मान आणि वेळेवर मिळणाऱ्या मोबदल्यासाठी आहे. आता याप्रकरणी निर्माते आणि संघटना यांच्यात काय तोडगा निघणार का? की कामगारांच्या संघर्षाची ही लढाई यापुढेही चालू राहणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.