तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘थलाइवी’ असं या बायोपिकचं नाव असून अभिनेत्री कंगना रणौत जयललिता यांची भूमिका साकारत आहे. कंगनाची बहिण रंगोली चंडेल हिने हा फर्स्ट लूक ट्विटरवर पोस्ट केला असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखसुद्धा जाहीर केली आहे. २६ जून २०२० रोजी हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जयललिता यांच्या रुपातील कंगनाचा लूक थक्क करणारा आहे. हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी कंगनाने २० कोटी रुपये मानधन स्वीकारल्याचं समजतंय. चित्रपटासाठी कंगनाने खूप मेहनत घेतली आहे. जयललिता यांच्याप्रमाणे हुबेहूब दिसण्यासाठी कंगनाने प्रचंड मेहनत घेतली असून तिला प्रोस्थेटिक मेकअपचा आधार घ्यावा लागला होता. या मेकअपचे काही फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हा बायोपिक वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. जयललिता यांची भाची जे. दीपा यांनी बायोपिकवर आक्षेप घेतला होता. याविरोधात त्यांनी मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती. आता कोणत्याही अडथळ्यांविना हा चित्रपट प्रदर्शित होणार का हे येत्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.