नववर्षाच्या पूर्वसंध्येला बंगळुरुत महिलांची छेड काढल्याची घटना ताजी असतानाच आता त्याच दिवशी रात्री उशीरा एका तरुणीचा भररस्त्यात विनयभंग केल्याची घटना समोर आली. विकृत मानसिकतेच्या टवाळखोरांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध स्तरांतून सध्या अनेकजण सदर प्रकरणी त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता अक्षय कुमारनेही त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन या प्रकरणी त्याचा संताप व्यक्त केला आहे. या ट्विटसोबत अक्षयने एक व्हिडिओही शेअर केला आहे.

‘थेट सांगायचं झालं तर मला आता एक माणूस म्हणूनही लाज वायतेय. सुट्टीचा आनंद घेऊन परतत असतानाच एका बातमीवर माझे लक्ष गेले. भर रस्त्यात घडलेल्या त्या घृणास्पद कृत्याची दृश्ये पाहून माला प्रचंड राग आला’, असे अक्षय कुमार या व्हिडिओमध्ये म्हणाला. बंगळुरु येथे झालेल्या त्या लज्जास्पद प्रकाराबद्दलचा राग अक्षयच्या चेहऱ्यावरुन आणि त्याच्या वक्तव्यातून थेट व्यक्त होताना दिसतोय. एका मुलीचे पालकत्त्व असलेला अक्षय म्हणाला की, ‘जो समाज महिलांचा आदर करु शकत नाही त्यांनी स्वत:ला मानवजातीत गणूच नये. किंबहुना त्यांना तसा हक्कच नाहीये’, असे म्हणत या प्रसंगी आपल्या निरर्थक विचारांचे ‘तारे’ तोडणाऱ्यांवरही अक्षयने निशाणा साधला आहे. मुली तोकडे कपडे घालून रात्री-अपरात्री बाहेर पडतातच का? असा प्रश्न करणाऱ्यांना अक्षयने चांगलेच सुनवले आहे.

महिलांच्या सबलीकरणासाठी पुढे सरसावणाऱ्या हल्लीच्या दिवसांमध्ये बंगळुरु येथे घडलेलेल्या या घटनेने अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. काही दिवसांपूर्वी नववर्ष साजरा करुन रविवारी रात्री अडीचच्या सुमारास पीडित तरुणी घरी परतत होती. पूर्व बंगळुरुमधील कम्मनहालीमध्ये ही घटना घडली आहे. नराधमांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये सुरुवातीला दुचाकीवरुन आलेले दोन तरुण त्या तरुणीच्या बाजूने गाडी नेतात. यानंतर पुन्हा मागे येऊन तरुणीपासून काही अंतरावर थांबतात. तरुणी जवळ येताच यातील एका नराधमाने तिला पकडले आणि तिचा विनयभंग केला. यानंतर त्या तरुणीला ढकलून देत दोघांनीही तिथून पळ काढला.