भाग मिल्खा भाग, लंचबॉक्स, इंग्लिश विंग्लिश या हिंदी चित्रपटांसह अन्य प्रादेशिक चित्रपटांना मागे टाकत ग्यान कोरीया यांच्या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या ‘द गुड रोड’ या गुजराती चित्रपटाची यंदा ऑस्करवारीसाठी निवड झाली आहे.
ऑस्कर चित्रपट पुरस्कारांच्या श्रेणीत ‘सवरेत्कृष्ट परदेशी चित्रपट’ या विभागासाठी भारतातर्फे ‘द गुड रोड’ पाठवण्यात येणार आहे. एका हरवलेल्या लहानग्याच्या आईवडिलांसोबतच्या पुनर्भेटीपर्यंतच्या प्रवासाची ही हृदयस्पर्शी चित्तरकथा आहे. भारतातर्फे ‘ऑस्कर’साठी पाठवल्या जाणाऱ्या चित्रपटासाठी यंदा चांगलीच चुरस होती. ‘द लंचबॉक्स’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘इंग्लिश विंग्लिश’, मल्याळी चित्रपट ‘सेल्युलॉईड’ आणि कमल हसन यांचा विश्वरूपम हे चित्रपट ऑस्कर सफरीसाठी चर्चेत होते. भारताच्या कानाकोपऱ्यांतून २२ प्रवेशिका आल्या होत्या. त्या सर्वामधून ‘द गुड रोड’ची एकमताने निवड झाली.
अनुराग कश्यप ‘निराश’
‘द लंच बॉक्स’ या चित्रपटाचा दिग्दर्शक रितेश बत्रा आणि निर्माता अनुराग कश्यप यांनी ‘द गुड रोड’च्या निवडीवर सडकून टीका केली आहे. ऑस्करमधील अंतिम पाच नामांकनांच्या यादीत येण्याची आमच्या चित्रपटास सर्वाधिक संधी होती, असे सांगत निवड समितीच्या या निर्णयामुळे आपण निराश झालो असल्याचे कश्यप यांनी सांगितले. मी हा चित्रपट बघितलेला नाही, पण ‘द लंच बॉक्स’ला अंतिम पाच जणांत स्थान मिळण्याची सर्वाधिक संधी होती, असे कश्यप यांनी म्हटले आहे.
‘द गुड रोड’चे वैशिष्टय़
गुजरातमध्ये कच्छ येथे फिरण्यासाठी म्हणून आलेल्या एका कुटुंबातील लहान मुलगा हरवतो. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटात चित्रित करण्यात आला आहे. यातून भारताच्या एका अज्ञात अंगाचे दर्शन प्रेक्षकांना होते आणि म्हणूनच या चित्रपटाची निवड झाल्याचे घोष यांनी सांगितले. सदर चित्रपटाची निर्मिती नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने केली आहे.