विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांना त्यांचे अश्रू आवरता आलेले नाही. नुकतंच विवेक अग्निहोत्री यांची पत्नी निर्माती पल्लवी जोशी हिने या चित्रपटाच्या शूटींगच्या शेवटचा दिवसाचा एक किस्सा सांगितला आहे. यावेळी तिने धक्कादायक खुलासा केला.
विवेकची पत्नी आणि निर्माती पल्लवी जोशी यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या शूटींगबद्दल खुलासा केला आहे. यावेळी पल्लवी जोशी म्हणाली, “या चित्रपटाच्या शूटींगचा शेवटचा दिवस होता. त्यावेळी माझ्या आणि विवेकच्या विरोधात काश्मीरमध्ये फतवा जारी करण्यात आला होता. मात्र आम्ही ही गोष्ट इतर कलाकार आणि क्रूपासून लपवून ठेवली होती.”
या चित्रपटामुळे सध्या सर्वत्र विवेक अग्निहोत्रींचे कौतुक होत आहे. पण ‘द काश्मीर फाईल्स’सारखा गंभीर चित्रपट बनवणे सोपे काम नव्हते. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान चित्रपटाची निर्माती पल्लवी जोशी यांनी याबाबत खुलासा केला. यावेळी पल्लवी जोशी म्हणाल्या, “द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पूर्ण होण्यास चार वर्षे लागली. पण याचे शूटींग हे एका महिन्यात पूर्ण झाले. यादरम्यान फतवा जारी झाला होता, तेव्हा आम्ही या चित्रपटाच्या शेवटच्या दृश्याचे शूटिंग करत होते.”
विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाईल्स’ बॉक्स ऑफिसवर हिट, दोन दिवसांची कमाई तब्बल…
“पल्लवी आणि विवेक यांनी याची कल्पना कोणालाही दिली नाही. त्यांनी ते गुपित ठेवले. कारण त्यावेळी सर्वांचे लक्ष शूटींगमध्ये असणे गरजेचे होते. जर ती संधी हातातून गेली असती तर आम्हाला दुसरी संधी मिळाली नसती. या शूटिंगदरम्यान निर्मात्यांसाठी हे एकमेव आव्हान होते”, असे पल्लवी जोशी यांनी सांगितले.
“विवेक अग्निहोत्रींना ‘द कश्मीर फाईल्स’मुळे इतक्या धमक्या मिळत होत्या की त्यांनी त्याचे ट्विटर अकाउंट बंद केले होते. सततच्या धमक्यांमुळे ते प्रचंड मानसिक तणाव घेत होते”, याचा खुलासा पल्लवी जोशी यांनी एका मुलाखतीदरम्यान केला होता.
‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.