कोकणच्या तांबड्या मातीतून अनेक लेखक, कवी उदयास आले आणि त्यांनी आपल्या मायमातीतलं सर्जन आपल्या साहित्यकृतींतून मांडलं. वि. स. खांडेकर, मामा वरेरकर, जयवंत दळवी, चिं. त्र्यं. खानोलकर, र. वा. दिघे, विंदा करंदीकर, श्री. ना. पेंडसे, मधु मंगेश कर्णिक… अशी कितीतरी मंडळी या लाल मातीतून उगवली आणि त्यांनी तिचे पांग फेडले. आज प्रवीण बांदेकरांसारख्या नव्या पातीत कवी अजय कांडर हेही एक लक्षणीय नाव समोर येताना दिसते. त्यांची कविता आपल्या मातीतले प्रश्न घेऊन उभी राहिलेली पाहायला मिळते. तांबड्या मातीशी असलेली त्यांची बांधीलकी दृढ आहे. त्यांच्या ‘आवानओल’ या आत्मपर कवितासंग्रहात त्यांची कोकणातील जडणघडण ते त्यांचा ‘माणूस’पणापर्यंतचा प्रवास प्रत्ययाला येतो. याच कवितासंग्रहावर आधारित ‘कळत्या- न कळत्या वयात’ हा दीर्घांक रचला गेला आहे. त्यातून हे जीवनदर्शन घडते आणि कवीला आकळलेल्या आजच्या संभ्रमित समाजाचं वास्तवही त्यातून मांडण्याचा प्रयत्न जाणवतो. हा कवितासंग्रह म्हणजे दीर्घकाव्य नाही. त्यामुळे त्यात एकच एक आशय उलगडणाऱ्या कविता असणं शक्य नाही.

कवीला आलेले, जाणवलेले, त्याने घेतलेले सुटे सुटे अनुभव त्यात आहेत. साहजिकपणेच त्यात गोळीबंद नाटकासारखा एकसंध अनुभव देण्याची क्षमता कितपत असेल, हा प्रश्नच. २००६-२००७ साली आलेला हा संग्रह. त्यावर बेतलेला ‘कळत्या- न कळत्या वयात’ हा दीर्घांक आता २०२५ सालात येतोय. परंतु त्यातील काही कवितांतून आशयाची संगती दिग्दर्शक रघुनाथ कदम यांना जाणवली असावी आणि त्यातूनच या दीर्घांकाचा जन्म झाला असावा. कवीच्या जन्मापासून त्याच्यावर झालेले भोवतालच्या निसर्गाचे, माणसांचे, परिस्थितीचे, आजूबाजूच्या वातावरणाचे परिणाम यात केन्द्रस्थानी आहेत.

साहजिकपणेच कोकणचा निसर्ग, तिथलं धार्मिक, भावनिक, सामाजिक वातावरण, कवीच्या सभोवतालची माणसं यांचे संस्कार त्याच्यावर न होते तरच नवल. त्यातून तो घडत गेला. त्याची विचारसरणी घडत गेली. आक्काआजी आणि ताईआजी यांचं परस्परविरोधी जगणं, वागणं, वृत्ती-प्रवृत्ती त्याच्यावर संस्कार करती झाली. त्यातून तो घडत गेला. या सगळ्याचे पडसाद या दीर्घांकात पडताना दिसतात. पुढे जाऊन शिक्षणादी गोष्टींनीही त्याच्या घडणीवर परिणाम केलेले जाणवतात. त्यातून जाणतेपणाने अनुभवलेले माणसामाणसांतील संबंध, निसर्ग, त्याची नाना रूपं आणि त्याच्याशी माणसाचं असलेलं साहचर्य हेही त्याच्यावर परिणाम करून जातं. ते त्याच्या कवितांतून उमटलेलं दिसतं. पुढच्या काळात त्याची कारभारीण त्याच्या आयुष्यात येते आणि आस्तिक्य-नास्तिक्याचा नवाच झगडा त्याच्या मनात उभा राहतो. जीवनातील अनुभवही त्याला खूप काही शिकवून जातात. माणसाची जातपात, धर्म यांच्याबद्दलचे प्रश्न त्याच्या मनात उभे राहतात. आणि त्याची ‘माणूस’पणाच्या दिशेकडची वाटचाल सुरू होते. हा सगळा आलेख या दीर्घांकात मांडलेला आहे. या कविता वेळोवेळी सुट्या सुट्या लिहिल्या गेल्या असणार. त्यामुळे आशय आणि परिणामाच्या दृष्टीनेही त्या वेगवेगळ्या असणार. मात्र त्यात काहीएक सूत्र निश्चितच असणार, ज्यामुळे दिग्दर्शकाला त्यात नाट्यानुभव असल्याचा साक्षात्कार झाला असणार.

पण त्याची बंदिस्त संहिता करून घेतली गेली नसावी; ज्यातून हे सलग नाट्य उभे राहील. त्यामुळेच हे नाटक तुटक तुटक वाटत राहतं. कवीची आजबद्दलची संभ्रमावस्था अचानक समोर ठाकल्यासारखी वाटते, ती त्यामुळेच. बालपणापासूनची कवीची भावआंदोलनं विस्तारानं येतात. भोवतीच्या माणसांबद्दलचं त्याचं कुतूहल, त्यातून त्याची प्रखर सामाजिक जाणीव घडत जाणं दृगोचर होत जाते. पण धर्म, जातपात याबद्दलची त्याची मतं विकसन होत आपल्यासमोर येत नाहीत. ती अचानक येतात. ही नाटकातली त्रुटी आहे. यावर काम होणं गरजेचं आहे. पण तरीही एक रंगचित्र नक्कीच आपल्यासमोर उलगडत जातं. लेेखक अजय कांडर आणि दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी यावर आणखी काम करायला हवं.

रजनीश कोंडविलकर यांनी कोकणचा परिसर दाखवताना स्तरीय नेपथ्याचा वापर केला आहे. अक्षय जाधव यांनी वातावरणातील विविध आवाजाच्या तुकड्यांची पार्श्वसंगीतात योजना केली आहे. मात्र प्रकाशयोजनाकार संजय तोडणकर यांनी केलेली विविधरंगी प्रकाशाची उधळण अचंब्यात टाकणारी आहे.

सर्वच कलाकारांनी कवितेचा आशय आत्मगत करून नाटक सजीव करण्याचा प्रयत्न केला आहे. अपर्णा शेट्ये (ताईआजी) आणि डॉ. अनुराधा कान्हेरे (आक्काआजी) यांनी भिन्न प्रकृतीच्या स्त्रिया नेमकेपणानं उभ्या केल्या आहेत. कारभारीण झालेल्या दीपा सावंत-खोत यांनीही आपली निग्रही भूमिका उत्तम वठवली आहे. निलेश भेरे यांनी कवीच्या विविध भावावस्था, त्याची भावनिक, मानसिक उलघाल उत्कटतेनं साकारली आहे.

एक वेगळा कवितानाट्यानुभव म्हणून या प्रयोगाचं स्वागत करायला हवं. कवीचा ‘माणूस’पणाकडचा प्रवास!