‘आमने सामने’ नाटकाचा चार वर्षांपूर्वी ३० ऑक्टोबर २०१९ रोज़्ी शुभारंभ झाला होता. रंगभूमीवर आल्यानंतर अल्पावधीतच समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी या नाटकाचे कौतुक केले. नाटकाचे छान स्वागतही झाले, परंतु दुर्दैवाने करोनाची लाट आली आणि त्यावेळी आलेल्या अनेक नवीन नाटकांप्रमाणेच ‘आमने सामने’ या नाटकाचेही प्रयोग थांबले. करोनानंतर पुन्हा नव्या जोमाने रंगभूमीवर आलेले ‘आमने सामने’ हे नाटक दोनशे प्रयोगपूर्तीच्या दिशेने वाटचाल करते आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर काही दिवसांनी ५० टक्के प्रेक्षक क्षमतेत प्रयोग सुरू झाले. त्याच काळात ‘आमने सामने’ या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा झी नाटय़गौरव पुरस्कार मिळाला. आता हे नाटक पुन्हा नव्याने छान मार्गी लागणार असे वाटत असतानाच पुन्हा १०० टक्के टाळेबंदी झाली आणि पुन्हा सगळं ठप्प झालं. मात्र टाळेबंदी संपली आणि नाटक सुरू झालं. आता या नाटकाचा २०० प्रयोगांचा टप्पा नजीक येऊन ठेपला आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी रविवार, दिनांक ९ एप्रिल रोज़ी दुपारी ३.४५ वाजता दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह पार्ले येथे ‘आमने सामने’ या नाटकाचा द्विशतक मोहोत्सवी आनंद सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार असल्याची माहिती नाटकाच्या निर्मात्यांनी दिली आहे.