अल्बर्ट ह्य़ुजेस दिग्दर्शित ‘अल्फा’ या चित्रपटाचा ट्रेलर सध्या इंटरनेटवर धमाल माजवतो आहे. तीन कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिलेल्या या पावणेतीन सेकंदांच्या ट्रेलरमध्ये कोल्हा आणि एका लहान मुलाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. २० हजार वर्षांपूर्वी युरोपमध्ये आलेल्या हिमयुगाचा परिणाम तेथील लोकांवर कसा झाला, यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. एक कुटुंब अचानक आलेल्या या बर्फाळ वादळामुळे एकमेकांपासून दुरावले जाते. भयानक वादळाच्या प्रवाहात त्या कुटुंबातील लहान मुलगा अनोळखी ठिकाणी जाऊन पोहोचतो. आईवडिलांचा शोध घेणाऱ्या या मुलावर कोल्ह्य़ांचा समूह हल्ला करतो. तो कसाबसा त्या हल्ल्यातून वाचतो. दरम्यान, त्याच समूहातील एका जखमी कोल्ह्य़ावर त्याची नजर जाते. घाबरलेला मुलगा त्या गोंधळलेल्या कोल्ह्य़ाला मदत करतो. पुढे दोघांची मैत्री होते आणि ते संकटातून बाहेर येण्यासाठी संघर्ष करतात. आपल्याला काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असेल तर संपूर्ण परिस्थिती आपण आपल्या बाजूने वळवू शकतो. हे दाखवणारी ही एक संघर्ष कथा आहे. लेखक डॅन विडेनहाप्ट यांच्या मते त्यांनी या चित्रपटातून काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या समाजात असंख्य लोक आहेत, ज्यांना सातत्याने प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशा परिस्थितीने वैतागलेली लोक हार मानून मृत्यू स्वीकारतात या लोकांना आशेचा किरण दाखवणारा हा प्रेरणादायी चित्रपट असल्याचे लेखकाचे म्हणणे आहे.