अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘दंगल’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे एकंदर कथानक आणि चित्रपटासाठी त्यातील सर्वच कलाकारांनी घेतलेली मेहनत पाहता प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेता आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेत झळकणार आहे. पण, आमिर व्यतिरिक्तही या चित्रपटामध्ये काही लक्षवेधी चेहरे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सध्या या चित्रपटातील सर्वच कलाकार प्रकाशझोतात आले आहेत असे म्हणायला हरकत नाही. ‘दंगल’ या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतरच काही दिवसांनी टेलिव्हिजन अभिनेत्री साक्षी तन्वर या चित्रपटामध्ये आमिरच्या ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका साकारणार आहे असे वृत्त आले होते. त्यानंतर या चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरमध्ये साक्षीची भूमिका पाहून अनेकांनीच तिची प्रशंसा केली.
अभिनेता आमिर खानने त्याच्या फेसबुक अकाऊंटद्वारे नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘दंगल’ या चित्रपटासाठी साक्षीची निवड कशी झाली ते स्वत: साक्षीच सांगत आहे. व्हिडिओमध्ये साक्षीच्या मेकअपपासून ते अगदी तिच्या हरयाणवी भाषेच्या अंदाजापर्यंत सर्व अनुभव साक्षीने शेअर केले आहेत. ‘या चित्रपटासाठी मला एकदा फोन आला. पण त्यावेळी मला कोणीतरी माझी मस्करी करत आहे असेच वाटले’, असे साक्षी म्हणाली. तर, आमिरने साक्षीची या चित्रपटात निवड कशी करण्यात आली यावरुन पडदा उचलला आहे. आमिर खानची आई जास्त टिव्ही पाहते, त्यामुळे ‘दंगल’ या चित्रपटामध्ये साक्षीची निवड करण्यासाठी आमिरच्या आईची महत्त्वाची भूमिका आहे असेच म्हणावे लागेल. या व्हिडिओमध्ये आमिर खाननेही साक्षीसोबत या चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. एखाद्या दृश्याचे चित्रीकरण करताना कशा प्रकारे पूर्णपणे समर्पित होऊन साक्षी त्या दृश्याला न्याय देते हेसुद्धा आमिरने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
साक्षीच्या कामातील प्रामाणिकपणा आणि कामाप्रतीची तिची निष्ठा पाहता दिग्दर्शक नितेश तिवारींनीही तिची प्रशंसा केली आहे. ‘दंगल’ या चित्रपटाच्या प्रमोशसाठी सध्या आमिर कोणत्याही टेलिव्हिजन कार्यक्रमामध्ये जात नाहीये. पण, तरीसुद्धी हे बिहाइंड द सीन्सचे व्हिडिओ मात्र प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढवत आहेत यात शंकाच नाही. २३ डिसेंबरला आमिर खानचा बहुचर्चित ‘दंगल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये आमिर खान महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेत झळकणार आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्तीच्या खेळात आपल्या मुलींना तरबेज बनवण्यासाठी आग्रही असणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी वडिलांच्या भूमिकेमध्ये आमिर झळकणार आहे. या भूमिकेसाठी आमिरने आणि त्याच्या ऑनस्क्रिन मुलींनी बरीच मेहनत घेतल्याचे याआधीच स्पष्ट झाले आहे. या चित्रपटातील गाणी आणि चित्रपटाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्येही ‘दंगल’बाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटामध्ये अभिनेत्री साक्षी तन्वर आमिरच्या भूमिकेमध्ये झळणार आहे. तर, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा आमिरच्या मुलींची म्हणजेच गीता आणि बबिताची भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे या सर्व कलाकारांची मेहनत कितपत फळते हे येत्या काळात कळेलच.