काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये नाव बदलून येण्याची क्रेझ होती. सिनेमात काम मिळावे म्हणून मूळ नावापेक्षा वेगळे नाव अनेक कलाकार ठेवायचे. अक्षयच्या मनातही असाच काहीसा विचार येऊन त्याने आपले नाव बदलले असेल का असा प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात असतो. पण आता त्यानेच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. मीड डे या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, त्याने त्याचे नाव राजीव भाटियावरुन अक्षय कुमार का केले ते सांगितले आहे.
अक्षय कुमार म्हणतो की, घराच्या शेजारी राहणाऱ्या कोणत्या ज्योतिषीने मला माझे नाव बदलायला सांगितले म्हणून मी माझे नाव बदलले नाही. याउलट सिनेमात काम करायला सुरुवात करण्याआधीच मी माझे नाव बदलले होते. मनात आलं नाव बदलावं म्हणून एक दिवस मी सहज माझे नाव बदलले. यामागे काहीत ठोस असे कारण नाही. राजीव हे काही वाईट नाव नाही, पण मला माझे नाव बदलावेसे वाटत होते. सिनेमात येण्याचा माझा तेव्हा काही विचारही नव्हता. मी तर मार्शल आर्ट ट्रेनिंग देणारे अक्षय भाटिया नावाचे कार्डही बनवले होते. तेव्हा मी अक्षय कुमार असे नाव लावत नव्हतो. मी अक्षय भाटियाच लावायचो. ज्या दिवशी कार्ड बनवले त्याच दिवशी मला पहिला सिनेमा मिळाला.
अनेकजण सिनेसृष्टीत येण्यासाठी म्हणून नाव बदलतात. माझ्या बाबतीत असे काही झाले नाही. कर्म धर्म सहयोगाने मी नाव बदलले त्यानंतर मला पहिला सिनेमा मिळाला. पण मी हे सिनेमात यावे म्हणून केले नव्हते. पण त्याचा फायदा मला झाला असेच म्हणावे लागेल. हे सगळं विज्ञान आहे असे मला वाटतं. प्रत्येक गोष्टीला एक विज्ञान असतं. कदाचित मला पहिला सिनेमा मिळावा यासाठीच हे सगळे झाले असेल.
अक्षयच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी २’ या सिनेमाने आता १०० कोंटींची कमाई करत आणखी एक टप्पा पार केला आहे. २०१७ या वर्षाच्या सुरुवातीला ‘जॉली एलएलबी २’ या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता अक्षय कुमार प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात त्याने साकारलेली भूमिकाही प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. ‘जॉली एलएलबी २’ या सिनेमाने आतापर्यंत १००.३७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.