चिनी सैन्याच्या डोळ्याला डोळा लावून भिडणाऱ्या भारतीय शूर विरांची कहाणी सांगणाऱ्या ‘पलटन’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. १९६७ साली झालेल्या भारत- चीन युद्धावर आधारित चित्रपट असून जेपी दत्ता या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ७ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘हिंदी चिनी भाई भाई’ म्हणत चीननं भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. १३८३ सैनिक मारले गेले, १०४७ जखमी झाले, तर १६९६ जण बेपत्ता झाले. १९६२ नंतर १९६७ पर्यंत भारतीय सैनिकानं निकरानं लढा दिला. या पाच वर्षांच्या काळातील भारतीय सैनिकांच्या जिद्दीची, धाडसाची कहाणी ‘पलटन’मधून पाहायला मिळणार आहे.

भारत चीनच्या युद्धानंतर १९६७ साली नाथुला येथे भारत आणि चिनी सैनिकात वादाची ठिगणी पडली. नाथुला जिंकण्यासाठी भारतीय सैनिकांनी प्राणांची शर्थ केली. भारतमातेच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या अशा कित्येक सैनिकांची कधीही न ऐकलेली कथा ‘पलटन’मधून उलगडणार आहे.

या चित्रपटात जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल, सोनू सूद, गुरमीत चौधरी, हर्षवर्धन राणे, सिद्धांत कपूर, लव सिन्हा, इशा गुप्ता, सोनल चौहान, दीपिका कक्कड़ असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे.