अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री क्रिती सॅनॉन यांनी ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या जोडीची प्रेक्षकांनी प्रचंड स्तुती केली होती. परंतु या चित्रपटानंतर टायगरने अद्याप क्रिती सोबत काम केलेले नाही. त्यामुळे भविष्यात जर संधी मिळाली तर तिच्यासोबत काम करणार का? असा प्रश्न टायगरला विचारण्यात आला. या प्रश्नावर टायगरने आश्चर्यचकित करणारे उत्तर दिले.

नेमकं काय म्हणाला?

बॉलिवूड हंगामाशी लाईव्ह चॅट करताना टायगर म्हणाला, “सध्या माझ्याकडे काम करण्यासाठी कुठलीही चांगली स्क्रिप्ट नाही. भविष्यात संधी मिळाली तर तिच्यासोबत काम करायला मला नक्की आवडेल. परंतु क्रितीबाबत सध्या काहीही बोलणे थोडे घाईचे ठरेल. कारण माझ्या सारख्या सामान्य कलाकाराच्या तुलनेत ती आता खूप मोठी स्टार झाली आहे.”

टायगरच्या या लाईव्ह चॅटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावर स्वत: क्रितीने देखील प्रतिक्रिया दिली आहे. “तो मला सुपरस्टार म्हणतोय, जिचा अद्याप एकही चित्रपट १०० कोटी रुपयांची कमाई करु शकलेला नाही. मला तुझ्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे.” अशा आशयाची गंमतीशीर प्रतिक्रिया क्रितीने दिली आहे.