छोट्या पडद्यावरील ‘उतरन’ आणि ‘डायन’ या लोकप्रिय मालिकांमधून अनेकांची मन जिंकणारी अभिनेत्री टीना दत्ता गेल्या काही दिवसापासून तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली. ब्रेकअप झाल्यानंतर टीना आता सावरली असून ती नवा जोडीदार शोधत आहे. मात्र तिला कलाविश्वातील जोडीदार नको असल्याचं तिने नुकतंच सांगितलं आहे. २०१९ च्या सुरुवातीलाच टीनाचं ब्रेकअप झालं. त्यानंतर ती प्रचंड नैराश्यात गेली होती. त्यानंतर ती पहिल्यांदाच ‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ब्रेकअपविषयी व्यक्त झाली.

‘आता मी पूर्ण लक्ष माझ्या जीवनाकडे आणि संसार थाटण्याकडे देणार आहे. परंतु मला अशा व्यक्तीची साथ नकोय जो कलाविश्वाशी निगडीत असेल. मला असा जोडीदार हवा, जो प्रामाणिक असेल आणि लोकांचा मान ठेवेल. मला त्याचवेळी प्रियकराला सांगायला हवं होतं की आता सगळं संपलं आहे. आमच्या नात्यात कटूता येण्यासाठी मी त्या एकट्याला दोषी मानत नाही. त्यात चूक माझीही होती. मी कमी वय असताना प्रेमात पडले आणि त्यावेळी मला एवढी समज नव्हती. त्यामुळेच मी चूकले. त्यावेळी त्याच्या मनात येईल त्या प्रत्येक गोष्टीला विचार न करता होकार देत गेले. पण आता जे झालं ते चांगलंच झालं. जो व्यक्ती तुमच्यावर हात उचलतो तो पुरुष नसतो. या नात्यानंतर आता मला कोणावरही विश्वास ठेवायला भिती वाटते’,असं टीना म्हणाली.

पुढे ती म्हणते, ‘त्या नात्यात असताना मी खूप नैराश्यात गेले होते. मी खूप काळजी, चिंतेत असायचे त्यामुळेच अनेक वेळा मी स्वत: ला मेकअप रुममध्ये बंद करुन घ्यायचे आणि खूप रडायचे’.

दरम्यान, ‘उतरन’ या मालिकेमुळे टीना दत्ता घराघरात पोहोचली होती. या मालिकेमध्ये तिने इच्छा ही भूमिका साकारली होती. टीनाच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं होतं. त्यामुळेच टीनाची लोकप्रियता कमालीची वाढली होती.