‘तारक मेहता का उल्टा चश्मा'(TMKOC)ही विनोदी मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे निरंतर मनोरंजन करत आहे. त्यामुळे या मालिकेतील कलाकारांचे आणि प्रेक्षकांचे एक वेगळे नाते तयार झाले आहे. आता तब्बल १६ वर्षांनंतर एका कलाकाराने ही मालिका सोडली आहे. गोलीची भूमिका साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कलाकार कुश शाहने मालिकेतून निरोप घेतला आहे. पुढच्या शिक्षणासाठी तो न्यूयॉर्कला जात असल्याने ही मालिका सोडल्याचे म्हटले आहे. आता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशींनी सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत कुशला शुभेच्छा दिल्या आहेत.
काय म्हणाले कलाकार?
सोशल मीडियावर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये त्यांनी लिहिले आहे, “तुझ्याबरोबर मी जितके सीन केले आहे, त्या प्रत्येक सीनचा मी आनंद घेतला आहे. तू जे सगळीकडे हास्य पसरवतोस, ते सतत सगळीकडे पसरत राहू दे, यासाठी खूप शुभेच्छा! आता तू बंदुकीच्या गोळीप्रमाणे खूप पुढे जावे, अशी माझी इच्छा आहे”, असा त्यांनी कुश शहासाठी मेसेज लिहिला आहे.

याबरोबरच या मालिकेत बबीताचे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्तानेदेखील सोशल मीडियावर कुशला शुभेच्छा दिल्या आहेत. ती म्हणते-“कुश, हे लिहिताना खरं तर माझ्या डोळ्यात पाणी आहे. मला तुझी खूप आठवण येईल. आपण कायम ट्रोलिंग आणि रॅगिंग पार्टनर राहू. तू खूप हुशार आहेस आणि तुझ्या प्रवासाचा आम्हा सगळ्यांनाच अभिमान आहे. तुला खूप शुभेच्छा! लवकरच भेटू”, असे तिने म्हटले आहे.

याशिवाय गोलीच्या आईच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री अंबिका रांजणकरने “मोठ्या गोष्टी मिळवण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, तुझ्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा, तुझी खूप आठवण येईल”, असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याबरोबरच, बागाची भूमिका साकारणाऱ्या तन्मय वेकारियाने त्याला शुभेच्छा देताना, “तो जितकी मालिकेची आठवण काढेल, त्यापेक्षा कितीतरी जास्त मालिकेला त्याची आठवण येईल”, असे म्हटले आहे.
हेही वाचा: ये रातें ये मौसम…; ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा ‘ब्लॅक अँड व्हाईट’ अंदाज; शेअर केला रोमँटिक व्हिडीओ
दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत कुशने गेल्या १६ वर्षांपासून गोलीची भूमिका साकारली आहे. त्याने नुकताच मालिकेचे निर्माते असित मोदींचे आभार मानणारा व्हिडीओ शेअर केला होता. त्याला निरोप देण्यासाठी मालिकेच्या सेटवर फेअरवेल पार्टीचे आयोजन केल्याचेदेखील पाहायला मिळाले होते. आता त्याला निरोप देताना त्याचे सहकलाकार भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.