शाहरुख खान आणि यशराज फिल्म हे हिंदी चित्रपटसृष्टीतील बऱ्याच काळापासून चालत आलेलं समीकरण आहे. यशराज बॅनर्सच्या निर्मितीत बनलेल्या विविध चित्रपटांमध्ये शाहरुख खानने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा दिग्दर्शित चित्रपटांच्या माध्यमातूनही शाहरुख अनेकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शाहरुख ते किंग खान बनण्यापर्यंतच्या शाहरुखच्या या प्रवासामध्ये यशराज फिल्म्सचा मोठा हात आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. पण, शाहरुखला घडवणाऱ्या यशराज फिल्म्सच्या एका महत्त्वाच्या व्यक्तीचे शाहरुख विषयीचे मत जाणून तुम्हीही थक्क व्हाल. पहिल्या भेटीतच शाहरुखची काही आमच्यावर छाप पडली नव्हती असा खुलासा आदित्य चोप्रा यांनी केला आहे. किंबहुना शाहरुखचे व्यक्तिमत्त्व फारसे प्रभावित करणारे नाही असे मत खुद्द यश चोप्रा यांनीही मांडले होते असा खुलासाही आदित्यने केला. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये आदित्य चोप्रांनी हे वक्तव्य केले आहे.
‘डर’ या चित्रपटाच्या वेळी शाहरुखची निवड करण्यामध्ये काहीसा धोका होता असे आदित्यच्या म्हणण्यातून स्पष्ट होत आहे. ‘आम्ही ज्यावेळी ‘डर’ या चित्रपटासाठी त्याची निवड केली तेव्हा मी खरं सांगतो, बाबांना आणि मला शाहरुख अजिबात आवडला नव्हता. त्यावेळी शाहरुख राकेश रोशन यांच्या ‘किंग अंकल’ या चित्रपटामध्ये व्यग्र होता. त्यानंतर तो आमच्या हाती लागला होता. त्याच्यामुळे आम्ही कोणीही प्रभावित झालो नव्हतो. कदाचित त्याला सगळेच नाकारत असल्यामुळे आम्ही संधी दिली होती’, असे आदित्य चोप्रा म्हणाल्याचे वृत्त डीएनए या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.
आदित्यच्या या वक्तव्यामुळे सध्या अनेकांच्याच भुवया उंचावल्या असून बॉलिवूड विश्वामध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. पण, पहिल्याच भेटीमध्ये इतरांना प्रभावित न करु शकणाऱ्या किंग खानच्या कारकीर्दीचा चढता आलेख पाहिला तर त्याचा हेवा वाटल्यावाचून राहणार नाही. पहिल्याच भेटीत यशराज मधील महत्त्वाच्या व्यक्तींवर फारसा प्रभाव पाडू न शकणाऱ्या शाहरुखचे आणि यशराज बॅनर्सचे नाते शब्दांत व्यक्त करणे तसे अशक्यच आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून विविध भूमिकांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर करुन असलेला किंग खान त्याच्या ‘द रिंग’, आणि ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटामध्ये शाहरुख खान, आलिया भटट्, कुणाल कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तर, ‘द रिंग’ या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.