बॉलीवूड चित्रपटांमध्ये प्रणयदृश्य किंवा चुंबनदृश्याचा समावेश असल्यास त्यावर सेन्सॉर बोर्डाने आजवर कठोर भूमिकाच घेतल्याचे पाहावयास मिळाले होते. अशी दृश्ये असलेल्या चित्रपटांना सेन्सॉरकडून एकतर कात्री लावली जायची किंवा त्यांना ‘ए’ प्रमाणपत्र दिले जायचे. पण, १२ चुंबनदृश्यांचा समावेश असलेल्या ‘बेफिक्रे’ चित्रपटाच्या ट्रेलरला सेन्सॉरने चक्क ‘युए’ प्रमाणपत्र दिले आहे. ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ला बहुदा प्रेमाच्या आविष्काराचा साक्षात्कार झाल्याचे दिसते.
‘बेफिक्रे’ चित्रपटात रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला ‘यूए’ प्रमाणपत्र मिळाल्याने दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि ‘बेफिक्रे’ची टीम खुश आहे. सेन्सॉरची नवी बाजू पाहावयास मिळाल्याने काही जणांना मात्र धक्का बसला आहे. या निर्णयाबाबत आपली बाजू मांडताना सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी म्हणाले की, चित्रपटातील प्रणयदृश्यांबाबत आम्ही कडक धोरण अवलंबतो तेव्हा त्याचा निषेध केला जातो. आणि परवानगी दिली तरीही त्यावर चर्चा होतेच. ‘बेफिक्रे’ चित्रपटातील चुंबनदृश्य उत्तेजित करणारी नसून तो प्रेमाचा आविष्कार मानायला हवा. ट्रेलरमध्ये चुंबनदृश्याचा वापर हा एका व्यक्तिचे दुस-या व्यक्तिवर असेलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी केला आहे. यातील चुंबनदृश्य लांबून चित्रीत करण्यात आली असून त्यात अश्लिल असे काही नाही. आदित्य चोप्रा यांनी सदर दृश्य अश्लिल वाटणार नाहीत अशा पद्धतीने यावर काम केले आहे, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी, याच सेन्सॉर बोर्डाने ‘बार बार देखो’ चित्रपटात स्त्रियांची अंतर्वस्त्र दाखविण्यात आलेल्या दृश्यास हे आपल्या संस्कृती विरुद्ध असल्याचे सांगत त्यास कात्री लावली होती. तसेच, ‘ऐ दिल है मुश्किल’मधील अनुष्का शर्माच्या चुंबनदृश्यावरही आक्षेप घेतला होता. मात्र, ‘बेफिक्रे’च्या वेळी बहुदा सेन्सॉरची गणितं बदलल्याचे दिसते.
संग्रहित लेख, दिनांक 24th Oct 2016 रोजी प्रकाशित
चुंबनदृश्य उत्तेजित करणारी नसून तो प्रेमाचा आविष्कार- सेन्सॉर बोर्ड
१२ चुंबनदृश्ये असलेल्या 'बेफिक्रे'च्या ट्रेलरला सेन्सॉरने 'युए' प्रमाणपत्र दिले आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 24-10-2016 at 10:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trailer of befikre passed with a ua certificate