मुंबई : आजच्या काळातील मुला-मुलींच्या आकांक्षा, त्यांच्या पालकांची इच्छा-अपेक्षा, गाव आणि शहरातील स्थिती असे मुद्दे मनोरंजक पद्धतीने हाताळत एक धमाल गोष्ट ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या विजय कलमकर दिग्दर्शित चित्रपटातून मांडण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात गावातील तरुणांच्या लग्नाचा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला असून संवादांना असलेला मालवणी बोलीचा तडका यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे.
सध्या राज्यभरातील ग्रामीण भागात मुलांची लग्न न जमणं ही समस्या झाली आहे. गावातील मुलींना शहराचे आकर्षण असते, त्यांच्याही आयुष्याबद्दल काही इच्छा-आकांक्षा असतात.
परिणामी शहर आणि ग्रामीण भाग अशी एक दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय, त्याच्याशी जोडलेले सामाजिक मुद्दे, परस्पर नातेसंबंध अशा विषयाची मांडणी ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटात करण्यात आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री वीणा जामकर, अभिनेता प्रल्हाद कुडतरकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत अशी उत्तम कलाकारांची फळी या चित्रपटात आहे. माती व नाती जोडणारा आणि प्रत्येक कुटुंबाची गोष्ट सांगणारा ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर १९ सप्टेंबरपासून झळकणार आहे.