टेलिव्हिजनची सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिव्यांका त्रिपाठी. ‘ये है मोहब्बते’ मालिकेतील आदर्श सून ‘इशिता’ची भूमिका साकारणारी दिव्यांका घराघरांत पोहोचली. तिला या लोकप्रियतेसोबतच चाहत्यांचंही भरभरून प्रेम मिळालंय. मात्र कधी कधी कलाकारांना त्याचं नुकसानंही झेलावं लागतं आणि दिव्यांकासोबतही असंच काहीसं घडलं होतं जेव्हा तिच्या एका चाहत्याने तिला खूप त्रास दिला होता.
तिचे चाहते तिच्यासाठी खूप हटके गोष्टी करत असतात असं दिव्यांका म्हणाली. मात्र एका चाहत्याने मर्यादाच ओलांडली. त्या चाहत्याचा किस्सा सांगताना दिव्यांका म्हणाली, ‘मी त्याला कधीच विसरू शकत नाही. तो तर माझा पाठलागसुद्धा करायचा. एखाद्या सावलीप्रमाणे तो नेहमी माझ्या लागे लागत होता. मला त्रास देत होता. तो मला रोज नवनवीन भेटवस्तू पाठवायचा. हे भेटवस्तू फक्त मलाच नाही तर माझ्या आईवडिलांनाही पाठवण्यास त्याने सुरूवात केली. इतकंच नाही तर आज मी या रंगाच्या कपड्यात खूप सुंदर दिसतेय असं फोन करून सांगायचा.’
वाचा : मुंबईकरांना प्रियांका देणार स्वच्छतेचे धडे
दिव्यांकाने त्या चाहत्याला आपल्या सर्व सोशल मीडिया साईट्सवरून ब्लॉक केलं आणि आपला फोन नंबर देखील बदलला. आपल्या कुटुंबियांनादेखील तिने नंबर बदलण्यास सांगितले. तसंच तो नेहमी आपल्यासोबत डेटवर जाण्यासही विचारायचा आणि अनेकदा त्याने लग्नाची पत्रिकाही पाठवली होती असंही तिने सांगितलं.
आता तो चाहता तिला त्रास देत नसल्याचं दिव्यांकाने स्पष्ट केलं मात्र आजही त्या सर्व गोष्टी आठवल्या की अंगावर काटा येत असल्याचं तिने म्हटलं. सध्या दिव्यांका ‘नच बलिये’ या डान्स शोच्या आठव्या सिझनमध्ये पती विवेकसोबत आपले नृत्यकौशल्य दाखवून प्रेक्षकांची मनं जिंकतेय.