तामिळ सुपरस्टार अभिनेता सूर्या वाढदिवसाला एका धक्कादायक घटनेमुळे गालबोट लागलं आहे. रविवार २३ जुलै रोजी सूर्याचा ४८ वा वाढदिवस होता. या खास सोहळ्यासाठी त्याचे चाहतेही खूप उत्सुक होते. पण आंध्र प्रदेशमध्ये आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त मोठे फलक लावताना दोन चाहत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. विजेचा झटका बसून दोघांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

एन व्यंकटेश आणि पी साई अशी या दोन्ही मृत चाहत्यांची नावे आहेत. शनिवारी ही घटना घडली, जेव्हा दोघेही त्यांच्या आवडत्या अभिनेता सुर्यासाठी एक मोठा बॅनर लावत होते. एन व्यंकटेश आणि पी साई नरसरावपेट शहरातील एका खाजगी महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोखंडी रॉडवर फ्लेक्स लावला होता तो ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आल्याने दोन्ही मुलांना विजेचा जोरदार झटका बसला आणि ते जागीच ठार झाले.

आणखी वाचा : ‘श्वास’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अश्विन चितळे सध्या काय करतो? मुलाखतीदरम्यान अभिनेत्याचा खुलासा

पी साईची बहीण अनन्याने तिच्या भावाच्या मृत्यूसाठी कॉलेज प्रशासनाला जबाबदार धरले. मीडियाशी संवाद साधताना अनन्या म्हणाली, “माझ्या भावाच्या मृत्यूला कॉलेज जबाबदार आहे. आम्ही कॉलेजला भरमसाठ फी भरत आहोत. महाविद्यालयात रुजू होण्यापूर्वी त्यांनी आम्हाला विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्याची आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु यासाठी महाविद्यालय सक्षम नसल्याचे स्पष्ट झाले आहे.”

रविवारी सुर्याच्या ४८व्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याच्या आगामी ‘कांगुवा’ या चित्रपटाची पहिली झलकही दाखवण्यात आली आहे. हा एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे, ज्याची पहिली झलक पाहून सोशल मीडियावर चाहते वेडे झाले आहेत. ‘कांगुवा’मधून सुरिया आणि दिग्दर्शक शिवा पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. या चित्रपटात योगी बाबू, रॅडिन किंग्सले, कोवई सरला आणि आनंदराज यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.