ashi singh shocking revelation about her casting couch experience : चित्रपटसृष्टीत एकदा चांगली कामं मिळायला लागली की, पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही गोष्टी आपसूकच मिळतात. त्यामुळेच या क्षेत्रात नशीब अजमावण्याचा लाखो तरुण-तरुणी प्रयत्न करतात. त्यातील काहींना यश येते, तर काहींची मात्र निराशा होते. चित्रपटसृष्टीत करिअर करू पाहणाऱ्या तरुणींचा मार्ग तर अधिकच खडतर असतो.
कारण- या क्षेत्रात काम मिळावे म्हणून या क्षेत्रातील काही जण तरुणींकडे शरीरसुखाची मागणी करतात. तशी अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. काही अभिनेत्रींनीही याबाबतचे एनेक धक्कादायक प्रसंग सांगितले आहेत. या पार्श्वभूमीवर आता अभिनेत्री आशी सिंहनेही तिच्याबरोबर घडलेला कास्टिंग काऊचचा एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.
अभिनेत्री आशी सिंह सध्या शब्बीर अहलुवालियाबरोबर ‘उफ्फ ये दिल है मुश्किल’मध्ये दिसली आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान तिने तिच्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितले, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
अभिनेत्री आशी सिंहने ‘झूम/टेली टॉक इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काऊचचा सामना करावा लागल्याबद्दल उघडपणे सांगितले. ती म्हणाली, “सुरुवातीला मी ऑडिशनसाठी जायचे. मला आठवतंय की, माझ्याबरोबर हे दोन-तीन वेळा घडलं होतं. लोक मला भूमिका ऑफर करायचे आणि त्या बदल्यात काहीतरी करायला सांगायचे. कोणीतरी होतं ज्याला वाटत होतं की, मी घरी बसावं आणि त्याच्या प्रोजेक्टची वाट बघावी. त्याला माझ्यात इन्व्हेस्टमेंट करायची होती. पण, हे चुकीच्या दिशेनं चाललंय हे मला समजत होतं.”
कास्टिंग काऊचवर आशी सिंहचा खुलासा
आशी सिंह पुढे म्हणाली, ‘पाच मुलींमधून मला निवडणारा दुसरा कोणीतरी होता. त्यानं मला एका खोलीत निर्मात्याला एकटीला भेटायला सांगितलं. मी माझ्या आईबरोबर तिथे गेले. मला काहीही झालं नाही; पण हो, तिथे काही विचित्र लोक होते. ते काम करतात की नाही हे मला माहीत नव्हतं.”
आशी सिंह बॉलीवूडमधील टीव्ही कलाकारांच्या टाईप कास्टिंगबद्दलही बोलली. जेव्हा तिला विचारण्यात आले की, तिला चित्रपटांमध्ये भूमिका मिळण्यास काही अडचण आहे का, तेव्हा ती म्हणाली, ‘मी असं म्हणणार नाही की, असं होत नाही. पण माझ्याबरोबर असं घडलेलं नाही. खरं तर, टीव्ही स्टार असल्यानं मला फक्त फायदा झाला आहे. जर एखाद्या कलाकाराकडे अनुभवाची कमतरता असेल, तर त्याला मोठ्या भूमिका साकारण्याची संधीदेखील मिळते. म्हणून माझ्या सर्व भूमिका मला अनुभवामुळे मिळाल्या आहेत.”
आशी सिंहने २०१५ मध्ये ‘सीक्रेट डायरीज’ या मालिकेतून पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘गुमराह’, ‘क्राइम पेट्रोल’ व ‘सावधान इंडिया’ यांसारख्या गुन्हेगारी विषयावर आधारित असलेल्या मालिकांमध्येही काम केले आहे. सध्या ती ‘उफ ये दिल है मुश्किल’मध्ये दिसत आहे. त्याशिवाय ती मुनव्वर फारुकीच्या ‘फर्स्ट कॉपी’ या मालिकेतही दिसली.