पुणे : नाटक हे केवळ  मनोरंजनाचे माध्यम नाही. जगातील प्रत्येक क्रांतीचे बीज रंगमंचावर  रोवले गेले आहे. त्यामुळे नाटकाचा शस्त्र म्हणून वापर करा, असा गुरुमंत्र ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांनी बुधवारी विद्यार्थ्यांना दिला. आपण अपुरे आहोत ही भावना जपली, की खूप काही सापडते. त्यामुळे कायम अपुरे राहा, असा संदेशही त्यांनी दिला.

सामाजिक आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी आयोजित ४५व्या फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेचे पारितोषिक वितरण पाटेकर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. स्पर्धेचे मुख्य संयोजक सूर्यकांत कुलकर्णी, ज्येष्ठ उद्योगपती अरूण फिरोदिया, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. जयश्री फिरोदिया, शशांक परांजपे, मिलिंद मराठे या वेळी उपस्थित होते. गायक राहुल देशपांडे, अभिनेता अमेय वाघ यांचा पाटेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी सांघिक आणि वैयक्तिक पारितोषिके प्रदान करण्यात आली. सूर्यकांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. विनोद सातव यांनी सूत्रसंचालन केले.

राज्य नाटय़ स्पर्धेबरोबरच फिरोदिया करंडक आणि पुरुषोत्तम करंडक या स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. या स्पर्धामध्ये आपल्या मनातला कल्लोळ  मांडता येतो. येथे कोणताही विधिनिषेध नसतो. कोणतीही व्यावसायिक तडजोड करावी लागत नाही. पुढे जाऊन अनेक व्यावसायिक तडजोडी कराव्या लागतात, असे सांगून पाटेकर म्हणाले, कलाकार पराकोटीचा आनंद देतो. लोक त्यांचा वेळ कलाकारासाठी देतात; म्हणून कलाकार नशीबवान असतो. प्रेक्षागृहातील अंधारात कलावंत स्वत:चे सुख, आनंद शोधतो. प्रेक्षक निघून गेल्यावर तो पुन्हा एकटा असतो. त्यामुळे कलावंताने प्रेक्षकांच्या मनात रूंजी घालत राहिले पाहिजे.

करंडक हा तात्पुरता आहे. त्याच्या पोटात काय आहे, याचा शोध घेतला पाहिजे. रंगमंचावर बोलले, की ती कला असते आणि रस्त्यावर बोलले की त्याचा कल्ला होतो. त्यामुळे कला आणि कल्ला यातला फरकही समजून घेतला पाहिजे.

आजवरच्या वाटचालीत फिरोदिया करंडकचे योगदान मोठे

महाविद्यालयात असताना मी सांघिक स्पर्धेशिवाय कोणत्याही स्पर्धेत सहभागी झालो नाही. बाहेर मी जे गाऊ  शकत नव्हतो, ते मला या मंचावर गायला मिळायचे. माझ्या आजवरच्या वाटचालीत फिरोदिया करंडक स्पर्धेचे योगदान खूप मोठे आहे, अशी भावना राहुल देशपांडे याने व्यक्त केली. त्यानंतर त्याने गायलेल्या ‘अलबेला सजन आयो रे’ या गाण्याला टाळ्यांची दाद मिळाली.

..तेव्हा करंडक मिळाल्याचीच भावना

मी तीन वर्षे फिरोदिया करंडक स्पर्धेत सहभागी झालो. पहिली दोन वर्षे आम्ही ‘डिबार’ झालो होतो. तिसऱ्या वर्षी ‘डिबार’ झालो नाही आणि मला अभिनयाचे पारितोषिक मिळाले, तेव्हा करंडक मिळाल्याचीच भावना होती, अशी आठवण अमेय वाघ यांनी सांगताच प्रेक्षागृहात हास्यकल्लोळ झाला.