मुंबई : व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा ‘ऊत’ हा आगामी मराठी चित्रपट विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये यशस्वी घोडदौड करीत आहे. कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या यशाचा डंका वाजविल्यानांतर आता ‘श्रीलंका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५’ मध्येही ‘ऊत’ चित्रपटाने आपल्या यशाची मोहोर उमटविली आहे. या महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपटाचा पुरस्कार’, ‘ऊत’ चित्रपटाने पटकावला आहे. ‘ऊत’ चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद व विविध पुरस्कारांची पोचपावती भारावणारी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून चित्रपटाच्या माध्यमातून बोधप्रद गोष्ट सांगण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे चित्रपटातील मुख्य अभिनेता आणि निर्माते राज मिसाळ यांनी आवर्जून नमूद केले.
वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित ‘ऊत’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात एक संघर्ष कथा पहायला मिळणार असून या सोबतच ‘ऊत’मध्ये एक प्रेमकथाही आहे. या प्रेमकथेचा नायक अभिनेता राज मिसाळ असून, अभिनेत्री आर्या सावे ही नायिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ही नवी जोडी मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
या वर्षाअखेर ‘ऊत’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मलेशिया चित्रपट महोत्सव, ईस्टर्न युरोप चित्रपट महोत्सव, ईस्ट विलेज न्यूयॉर्क चित्रपट महोत्सव, सिनसिने चित्रपट महोत्सव, श्रीलंका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मँचेस्टर चित्रपट महोत्सव, अहमदाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आदी विविध राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘ऊत’ या मराठी चित्रपटाने आपली यशस्वी मोहोर उमटविली आहे.