गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातून अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे आज (७ ऑक्टोबर) निधन झाले. पहाटे ४.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘फूल और अंगारे’, ‘खलनायक’, ‘3 इडियट्स’, ‘केदारनाथ’ आणि ‘पानिपत’यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरुण बाली यांच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून माझ्या वडिलांना मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाचा गंभीर आजार झाला होता. यात नसा आणि स्नायू यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा अडथळा निर्माण होतो. या आजारामुळे ते त्रस्त होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना यासंदर्भात रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. पण आज मुंबईत पहाटे ४.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी आणि चाहते याबाबत शोक व्यक्त करताना दिसत आहेत.

अरुण बाली यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. यात शाहरुख खान, अक्षय कुमार आणि सुशांत सिंह राजपूतसारख्या कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. अरुण बाली हे मनोरंजन विश्वातील खूप मोठे आणि प्रसिद्ध नाव होते. त्यांनी अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. ‘नीम का पेड़’, ‘दस्तूर’, ‘चाणक्य’, ‘देख भाई देख’, ‘द ग्रेट मराठा’, ‘शक्तिमान’, ‘स्वाभिमान’, ‘देस में निकला होगा चांद’, ‘कुमकुम- एक प्यारा सा बंधन’, ‘वो रहने वाली महलों की’ और ‘देवों के देव महादेव’ यासारख्या अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.

अरुण बाली यांना बॉलीवूड चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखले जायचे. त्यांनी ‘सौगंध’, ‘यलगार’, ‘राजू बन गया जेंटलमैन’, ‘खलनायक’, ‘राम जाने’, ‘पुलिसवाला गुंडा’, ‘सबसे बड़ा खिलाड़ी’, ‘सत्या’, ‘शिकारी’, ‘हे राम’, ‘आंखें’, ‘जमीन’, ‘अरमान’ या चित्रपटात काम केले. विशेष म्हणजे ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘3 इडियट्स’, ‘बर्फी’, ‘ओह माय गॉड’, ‘पीके’, ‘एयरलिफ्ट’, ‘बागी’, ‘केदारनाथ’, ‘पानीपत’ आणि काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातही ते झळकले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actor arun bali passes away at the age of 79 years in mumbai nrp
First published on: 07-10-2022 at 10:25 IST