आपल्या दिलखेच अदांनी महाराष्ट्रातील तमाम तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या वैभव तत्ववादीचा आणखी एक नवा कोरा सिनेमा येऊ घातला आहे. या सिनेमात वैभव कोणत्याही रोमॅण्टिक भूमिकेत नसून एका वेगळ्याच भूमिकेत तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आगामी सिनेमात तो एका आर्किटेकची भूमिका साकारणार आहे. ‘कॉफी आणि बरंच काही’ या सिनेमाचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे हेच या नव्या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून पुढच्या महिन्यापासून या सिनेमाचं चित्रीकरण सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी’ या सिनेमांमधून वैभवने रोमॅण्टिक भूमिकेतून महाराष्ट्रातील तरुणींना वेडं केलं. शिवाय, इतर सिनेमांमधूनही वैभवने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. या नव्या चित्रपटाविषयी बोलताना वैभवने म्हणाला की, ‘आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा या सिनेमातील माझी आर्किटेकची भूमिका फार वेगळी आहे. त्यामुळे या सिनेमासाठी मीसुद्धा फार उत्सुक आहे.’
‘हंटर’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘लिपस्टिक अण्डर माय बुरखा’ अशा बॉलिवूड सिनेमांमधून वैभवने कामं केलं आहे.

‘बाजीराव मस्तानी’मधील त्याच्या चिमाजी आप्पा या ऐतिहासिक भूमिकेचंही फार कौतुक झालं होतं. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘लिपस्टिक अण्डर माय बुरखा’मधील त्याची भूमिका गाजली होती. सध्या तो ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असून या सिनेमातही तो ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे वैभवच्या या विविधांगी भूमिका पाहण्यासाठी त्याचे चाहतेही आतूर झाले आहेत.
दरम्यान, या वैभवच्या नव्या मराठी सिनेमाचं चित्रिकरण पुढच्या महिन्यापासून मुंबई आणि दुबईत होणार असून सिनेमाचं नाव अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viabhav tatwawadi will play architect character in his upcoming marathi movie
First published on: 20-03-2018 at 01:17 IST