आज, १ मे हा महाराष्ट्राचा स्थापना दिवस, हा दिवस दरवर्षी संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राविषयी असणारं प्रेम, आदर आणि आपल्या जबाबदारीची जाणीव करुन देणारा हा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन. विशेष म्हणजे आजच्या दिवशी कामगार दिनदेखील साजरा केला जातो. राज्यातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. यामध्ये आपले सेलिब्रिटी तरी आज कसे मागे राहतील. आज या दिवसानिमित्त मराठी कालाकारांनी खास व्हिडीओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

करोना विषाणूमुळे जरी देशात लॉकडाउन असला तरीदेखील आपले कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आली आहेत. ‘बघतोस काय मुजरा कर’ या गाण्यातून त्यांनी महाराष्ट्राविषयी त्यांचं प्रेम, आदर व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे या कलाकारांनी एकत्र न येता त्यांच्याच घरी राहून हा व्हिडीओ शूट केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर गाजत आहे. विशेष म्हणजे या गाण्यात महाराष्ट्रातील महत्त्वाची ठिकाणं, संस्था यांची माहिती देण्यात आली आहे.

स्वरूप स्टुडिओ आणि चलचित्र कंपनीच्या आकाश पेंढारकर, हेमंत ढोमे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हेलोच्या सहकार्याने या व्हिडिओची निर्मिती केली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटातील बघतोस काय मुजरा कर या गाण्याच्या चालीवरच क्षितिज पटवर्धन यांनी नवं गीत लिहिलं आहे. अमितराज यांचं संगीत असून, हर्षवर्धन वावरे, कस्तुरी वावरे यांनी हे गीत गायलं आहे.

या व्हिडीओमध्ये बघतोस ‘काय मुजरा कर’ हे गाणं नव्या पद्धतीने चाहत्यांसमोर सादर करण्यात आलं आहे. मराठी कलाविश्वातील दिग्गज कलाकार झळकले आहेत. व्हिडिओमध्ये सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, सुमीत राघवन, शशांक केतकर, रसिका धबडगांवकर, संजय जाधव, प्रार्थना बेहरे, अमितराज, अभिनय बेर्डे, सौरभ गोखले, अनुजा साठे, चैत्राली गुप्ते, लोकेश गुप्ते, सिद्धार्थ मेनन, कीर्ती पेंढारकर, सुयश टिळक, सायली संजीव, प्राजक्ता माळी की कालाकार मंडळी झळकली आहेत.