गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि शेफाली शाह यांच्या ‘जलसा’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘जलसा’ हा चित्रपट हिट अँड रन प्रकरणावर आधारीत चित्रपट आहे. खरतरं ‘जलसा’ चित्रपटाची चित्रपटाची कथी एका नावाजलेल्या पत्रकाराच्या आयुष्यात घडलेल्या सर्वात भयानक प्रसंगाच्या अवती भोवती फिरते. चित्रपटात विद्या बालनने माया मेनन, शेफालीने रुखसाना या भूमिका साकारली आहे. माया मेनन ही पत्रकार असते तर रुखसाना तिच्या घरी ३ वर्षांपासून मोलकरीण म्हणून काम करत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटाची सुरुवात ही एका धक्कादायक घटनेने होते. माया मेनन अतिशय लोकप्रिय न्यूज पोर्टलची प्रसिद्ध अँकर आणि पत्रकार आहे. एका रात्री माया निवृत्त सरन्यायाधीशांची मुलाखत घेते. त्यानंतर घरी जाण्यासाठी निघालेल्या मायाला गाडी चालवताना अचानक डुलकी लागते आणि तिच्या कारचा भीषण अपघात होतो. यानंतर जणू मायाचं आयुष्य बदलतं आणि या अपघाताचा परिणाम हा फक्त माया आणि तिच्या कुटुंबावर होत नाही, तर तिची मोलकरीण रुखसानाच्या आयुष्यावरही होतो. आता या अपघाताचा आणि मायाच्या घरात काम करणाऱ्या रुखसानाचा काय संबंध आहे ही कथा फार रंजक पद्धतीने चित्रपटात मांडण्यात आलीय.

आता अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर विद्या बालन आणि शेफाली शाह आपापल्या भूमिका उत्तम प्रकारे साकारल्या आहेत. विद्याने महिला पत्रकाराची भूमिका साकारताना बारकावे अचूक टीपलेत. स्पष्टवक्तेपणा तिच्या देहबोलीमधूनच दिसून येतो. दुसरीकडे शेफालीने एक आई आणि मोलकरीण अशा दुहेरी भूमिकेला उत्तम न्याया दिलाय. मोलकरीण म्हणून मायाशी असणारं नातं तिने अगदी सुरेखपणे पड्यावर रेखाटलं आहे. दोन तोडीच्या अभिनेत्रींच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटाच्या निमित्ताने पहायला मिळते. इंग्रजीत म्हणतात त्याप्रमाणे इट्स अ ट्रीट टू वॉच देम! प्रकारचं काम केलंय दोघींनीही.

जर तुम्ही विद्या आणि शेफालीचे चाहते असाल तरा हा चित्रट तुमच्यासाठी मस्ट वॉच यादीमधील आहे, असं म्हणता येईल. या अभिनयाला दिग्दर्शनाची जोड मिळाली असती तर चित्रपटाची कथा अजून फुलली असती. या चित्रपटाचं दिग्दर्शन हे सुरेश त्रिवेणी यांनी केलं आहे. कुठेतरी हा चित्रपट दिग्दर्शनात मागे पडलाय असं वाटतं. दिग्दर्शनामुळे चित्रपट काही वेळातच कंटाळवाणा वाटतो. पण चित्रपटातील अभिनय आणि चित्रपटाचा वेग थोडा कायम राखण्यात यश मिळाल्याने अगदीच तो सोडून द्यावासा वाटत नाही. अर्थात या चित्रपटाची लांबी देखील कमी करता आली असती असं अनेकदा वाटतं. हा चित्रपट २ तास ९ मिनिटांचा आहे. तो अधिक शॉर्ट आणि स्वीट करता आला असता.

चित्रपटात एक नोकरी करणारी महिला तिच्यावर असलेलं दडपण, त्यात जर स्त्री घटस्फोटीत असेल तर तिला कशाप्रकारे सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात हे दाखवण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त उच्चभ्रु लोक आणि सर्वसामान्य जनता यांच्यात असलेला फरक, सामाजिक, मानसिक आणि आर्थिक दृष्टया एखादी व्यक्ती कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरे जाते हे उत्तम प्रकारणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. समाजातील दोन घटकांचे प्रातिनिधित्व या दोन मुख्य व्यक्तिरेखा करतात. यामधून दोन समाज समांतर कसे जगतात यावर भाष्य करणारा पुसटसा प्रयत्न अनेक दृष्यांमधून जाणवतो.

चित्रपटाचा शेवट एखाद्या बोधकथेप्रमाणे आहे. हा संदेश खरोखरच दैनंदिन जीवनामध्ये लागू केल्यास त्याचा फार फायदा होईल. पण हा संदेश काय आहे हे तुम्हीच चित्रपट पाहून जाणून घ्या.

लोकसत्ता ऑनलाइनकडून ‘जलसा’ला तीन स्टार

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya balan shefali shah jalsa mpvie review dcp
First published on: 21-03-2022 at 16:18 IST