विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारी अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करत आले. ‘सुलू’ असो किंवा मग ‘बेगमजान’ प्रत्येक भूमिकेला तितक्याच प्रभावीपणे रुपेरी पडद्यावर उतरवणारी विद्या नेहमीच तिच्या अभिनयाच्या माध्यमातून अनेकांनाच आश्चर्यचकित करत गेली. चित्रपट, मालिका यांच्यानंतर विद्याने तिचा मोर्चा वेब सीरिजकडे वळविला आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून विद्या इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.

सागरिका घोष यांच्या ‘इंदिरा : इंजियाज मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकारवर आधारित ही सीरिज असून याचं दिग्दर्शन रितेश बत्रा करणार आहेत. रितेश बत्रा यांनी यापूर्वी ‘द लंच बॉक्स’ आणि ‘फोटोग्राफ’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचा अनुभव आहे. या वेब सीरिजच्या निर्मितीसाठी विद्याने या पुस्तकाचे हक्क विकत घेतले आहेत.

“ही माझी पहिलीच वेब सीरिज आहे आणि या सीरिजची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करत आहेत. सध्या आम्ही सगळेच या पुस्तकाचा आणि विषयाचा अभ्यास करत आहोत. वेगवेगळ्या प्रसंगांची माहिती मिळवत आहोत. मात्र हे काम प्रचंड मेहनतीचं आहे. त्यामुळे याला वेळ लागणार आहे”, असं विद्याने सांगितलं.

दरम्यान, विद्या राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री असून या सीरिजच्या माध्यमातून पहिल्यांदाच वेब सीरिच्या विश्वात पदार्पण करणार आहे. काही दिवसापूर्वीच विद्याची मुख्य भूमिका असलेला ‘मिशन मंगल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.  भारताच्या यशस्वी मंगळ मोहिमेची कथा या चित्रपटातून उलगडण्यात आली आहे. विद्या व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा हे कलाकारही झळकले आहेत.