शाहिद कपूर व कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला ‘कबीर सिंग’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करत आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. तेलुगू चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याने मुख्य भूमिका साकारली होती. ‘कबीर सिंग’ला मिळणारा प्रतिसाद पाहून विजयने आनंद व्यक्त केला असून कियारासाठी त्याने खास भेटसुद्धा पाठवली आहे.
विजयने पाठवलेल्या भेटवस्तूचा फोटो कियाराने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या भेटवस्तूसोबत विजयने कियारासाठी पत्रसुद्धा लिहिलं आहे. ‘कियारा, कबीर सिंगच्या यशाबद्दल तुझं अभिनंदन! हा यश साजरा कर. शुभेच्छांसोबतच माझे कपडे पाठवतोय.. कदाचित हे चुकीचं वाटेल.. माझ्या ब्रँडचे कपडे भेट म्हणून पाठवतोय,’ असं विजयने या पत्रात लिहिलं.
‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाने टॉलिवूडसोबतच बॉलिवूडलाही भुरळ पाडलं होतं. तेलुगू चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वांगा यांनीच ‘कबीर सिंग’चं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट पाहिला का असा प्रश्न विजयला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विचारला असता तो म्हणाला, ‘मी अजून हिंदी चित्रपट पाहिला नाही. कारण शूटिंगनिमित्त मी फान्सला होतो. दोन दिवसांपूर्वी मी हैदराबादला आलो आणि इथे आल्यापासून मला ताप आहे. पण लवकरच मी तो चित्रपट पाहीन. संदीप वांगा यांनी रिमेकचं दिग्दर्शन कसं केलं हे मला पाहायचं आहे.’
‘कबीर सिंग’ने नऊ दिवसांत १६३.७३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दहाव्या दिवशी हा चित्रपट १७५ कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.