रंगभूमी ते मराठी-हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे अभिनेते विक्रम गोखले यांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. गेल्यावर्षी विक्रम गोखले यांचे निधन झाले. त्यांची अखेरची भूमिका असणारा ‘सूर लागू दे’ हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘अस्सल कलावंत असलेले विक्रम गोखले शेवटपर्यंत काम करत राहिले. जे चित्रपट त्यांनी स्वीकारले ते पूर्ण करण्यासाठी ते स्वत: प्रयत्नशील असायचेच, पण अनेकदा निर्माता-दिग्दर्शकांनाही चित्रपट प्रदर्शित करताना काही अडचणी येत असल्यास मार्गदर्शन करण्यापासून प्रत्यक्ष मदतीपर्यंत त्यांचा सहभाग असायचा. अगदी प्रकृती अत्यवस्थ असतानाही रुग्णालयातून घरी परतल्यानंतर ते ‘सूर लागू दे’च्या चित्रीकरणासाठी आले आणि त्यांनी आपली भूमिका चोख निभावली’, अशी आठवण चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण विजया एकनाथ बिर्जे यांनी सांगितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 निर्माते नितीन उपाध्याय आणि अभिषेक किंग कुमार यांची निर्मिती आणि रतीश तावडे, अश्विन पांचाळ आणि देवांग गांधी यांची प्रस्तुती असलेल्या ‘सूर लागू दे’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच एका छोटेखानी समारंभात करण्यात आले. ३० ऑक्टोबर रोजी अभिनेते विक्रम गोखले यांचा वाढदिवस असतो, याच दिवसाचे औचित्य साधत बांद्रा येथील एमआयजी क्लबमध्ये विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली विक्रम गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते ‘सूर लागू दे’च्या नवीन पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. या सोहळय़ाला ज्येष्ठ पटकथा लेखक अनिल कालेलकर, मनोज पाखाडे, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकारांसह सिनेसृष्टीतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी विक्रम गोखलेंच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. विक्रम गोखले यांच्या अभिनयाने सजलेली ‘सूर लागू दे’सारखी दर्जेदार कलाकृती सर्वदूर पोहोचवण्याच्या हेतूने हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आणण्यात येणार असल्याचे प्रस्तुतकर्ते रतिश तावडे यांनी सांगितले. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आलेल्या अभिनेत्री सुहासिनी मुळय़े आणि विक्रम गोखले या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्गज कलाकारांची जुगलबंदी प्रेक्षकांना खिळवून ठेवेल अशी आशा दिग्दर्शक प्रवीण बिर्जे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>>छोटा पडदा गाजवणाऱ्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ला १० वर्ष पूर्ण! प्राजक्ता माळी म्हणाली, “महाराष्ट्रातील सगळ्या पोरींना…”

 आयुष्याच्या संध्याकाळचे एक विलोभनीय चित्र या चित्रपटाच्या रूपात सादर करण्यात आलं आहे. मनोरंजनासोबतच सामाजिक जाणिवेचं भान राखून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. विक्रम गोखले यांना समर्पित करण्यात आलेल्या या चित्रपटाचं लेखन आशीष देव यांनी केलं असून, संगीतकार पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. मालिकांबरोबरच मराठी चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री रीना मधुकर आणि ‘कलियों का चमन..’ फेम अभिनेत्री मेघना नायडू यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पिकल एन्टरटेन्मेंट स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikram gokhale last film soor lagoo de in theaters early amy
First published on: 26-11-2023 at 02:44 IST