बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. आज विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी आहे. विलासराव देशमुखांच्या पुण्यतिथीनिमित्ताने देशभरातून त्यांना अभिवादन केलं जातं आहे. यातच रितेश देशमुखने आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्ताने एक भावूक व्हिडीओ शेअर केला आहे.
रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात रितेश वडिलांच्या म्हणजेच दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या एका कुर्ता आणि जॅकेटला कुरवाळताना दिसतोय. वडिलांच्या या कपड्यांमध्ये तो त्यांचा स्पर्श अनुभवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. तर वडिलांच्या कुर्त्याला मिठी मारत तो त्यांच्या त्या प्रेमळ आठवणींना उजाळा देताना दिसतोय. रितेशने शेअर केलेला हा व्हिडीओ खूपच भावूक असून तो पाहून कुणाचेही डोळे पाणावतील. या व्हिडीओतून रितेशचं आपल्या वडिलांवर असलेलं प्रेम दिसून येत आहे. व्हिडीओ शेअर करत रितेश कॅप्शनमध्ये म्हणाला, “तुम्हाला रोज मिस करतो बाबा”.
View this post on Instagram
रितेशने शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक चाहत्यांनी पसंती देत भावना व्यक्त केल्या आहेत. रितेशने अनेकदा आपल्या वडिलांच्या आववणीत पोस्ट शेअर केल्या आहेत. रितेश सोबतच जेनिलियाने देखील एक खास पोस्ट शेअर केली आहे. जेनिलियाने सासरे विलासराव देशमुख आणि रितेशचा एक फोटो शेअर केलाय. कॅप्शनमध्ये तिने भावना व्यक्त केल्या आहेत. यात ती म्हणाली, “मला माहितेय तुम्ही जिथे कुठे असाल तिथून आम्हाला असेच आम्हाला पाहत असणार. कारण आपले प्रियजन कधीच आपल्याला सोडून जात नसतात. ते आपल्यावर प्रेम करत राहतात, आपली काळजी घेतात, आपल्याला योग्य मार्ग दाखवतात.” असं जेनिलिया म्हणाली आहे.
View this post on Instagram
पुढे जेनिलियाने लिहिलंय, “तुमची खूप आठवण येते. मला खात्री आहे तुम्ही जिथे कुठे असाल तिथे आनंद पसरवत असाल.” असं म्हणत जेनिलियाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.