नीलेश अडसूळ

आजवर अनेक कलाकारांनी चित्रपट आणि नाटकांमधून नकारात्मक भूमिका साकारून रसिकजनांची मने जिंकली आहेत. खलनायक किंवा खलनायिका हे दोन शब्द आले की काही ठरावीक चेहरे लगेच आपल्या डोळ्यांपुढे येतात. मग निळू फुले असो किंवा ललिता पवार. हे जरी प्रातिनिधिक उदाहरण झालं तरी असे अनेक दिग्गज सहज डोळ्यांपुढे तरळतात. आणि नाटक-सिनेमांमधूनच मालिकांचा जन्म झाल्याने हीच परंपरा मालिकांमध्येही दिसून येते. मालिकेच्या नावात, शीर्षकगीतात, माध्यमांत जरी ‘नायक आणि नायिका’ झळकत असले तरी मालिकेला खेळवण्याचे काम खलभूमिकांकडूनच केले जाते. मग अशावेळी वाहिन्यांकडून नायक-नायिकेला अग्रभागी ठेवण्याचा पवित्रा असला तरी मालिकेच्या वाढत्या भागांसोबत आणि लोकाप्रियतेसोबत खलनायक किंवा खलनायिकाच मालिकेचा चेहरा बनून जातात हे काही खोटे नाही. पूर्वीची वानगी इथे देण्याची तशी आवश्यकता नाही, कारण आताच्या मालिकांमध्येही ठकास महाठक नकारात्मक भूमिकांची सरबत्ती आहे.

बऱ्याचदा या नकारात्मक भूमिकांचा मालिकेवर एवढा परिणाम होतो की मालिका एका बाजूला आणि खलभूमिका करणारी व्यक्तिरेखा एका बाजूला अशी अवस्था असते. मिलिंद शिंदेसारख्या बहुआयामी कलाकाराला आजही अनेक ठिकाणी ‘तू तिथे मी’ या मालिकेतील त्यांनी साकारलेला ‘तांबडे बाबांचा भक्त’ पुन्हा एकदा सादर करून दाखवा अशी मागणी केली जाते. कारण अशा भूमिकांच्या कुरघोडय़ांवर बोटं मोडून, शिव्या देऊ न प्रेक्षक त्यांच्या अधिकच प्रेमात पडत जातात.

‘सोनी मराठी’वरील ‘एक होती राजकन्या’ या मालिकेत नुकतीच एका व्यक्तिरेखेची एंट्री झाली आहे. साडी नेसलेला देवीचा पुरुष भगत आणि त्याची भाकिते यामुळे मालिकेत नवा ट्रॅक सुरू झाला आहे. अवनीच्या वडिलांच्या हत्येशी कुठे तरी या भगताचा संबंध असल्याने हे पात्र मालिकेत बरीच रंगत आणणार आहे. वरकरणी तो देवीचा भगत असला तरी त्याचे हात अनेक ठिकाणी अडकल्याचे दिसते. सध्या अवनी घेत असलेल्या वडिलांच्या खुन्याचा शोधात भाऊ राव तिला यशस्वी होऊ  देईल का किंवा तिच्या मार्गातील तिढा अधिकच वाढवेल हे काही भागातच स्प्ष्ट होईल.

सध्या ‘कलर्स मराठी’वरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत नायकांपेक्षा खलनायकांचीच अधिक गर्दी पाहायला मिळते. पण याची कुठेही विसंगती होऊ  न देता प्रत्येक नकारात्मक पात्र आपापल्या ठिकाणी योग्य ती भूमिका बजावत आहे, किंबहुना त्याच भूमिका या मालिकेचा आत्मा झाल्या आहेत. मंगल, आत्याबाई, सरकार, नरपत अशा विविध पात्रांची एका वरचढ एक कारस्थाने प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहेत. विशेष म्हणजे मालिकेतील मुख्य नायक दाखवलेल्या शिवाची आई ‘मंगल‘ आणि रुद्रा गावातील लोकप्रतिनिधी ‘आत्याबाई’ या मालिकेची आघाडी सांभाळत आहे. कौटुंबिक स्तरावर मंगलचे आपल्या नाटकी वृत्तीने सिद्धीच्या वाटेत खो घालण्याचे काम नित्यनेमाने सुरूच आहे. शिवा-सिद्धीच्या जागरण गोंधळातही मंगल देवीचा अंगात संचार झाल्याचा बनाव करते. बऱ्याचदा मंगलच्या अशा कुरघोडय़ांमुळे सिद्धीला जरी त्रास झाला तरी प्रेक्षकांमध्ये मात्र हास्याची खसखस पिकते. सध्या सरकारच्या मनात सोनीविषयी आकर्षण निर्माण झाल्याने शिवाच्या बाबतीत असलेले त्यांचे वागणे बदलून गेले आहे. आता मागचा सगळा अपमान विसरून शिवा आपल्या बहिणीला सरकारांच्या घरात देईल का? आणि आत्याबाई या प्रकाराला काय वळण देतील हे पाहण्यासाठी मात्र पुढील काही भाग आपल्याला पाहावे लागतील.

तर ‘हे मन बावरे’ या मालिकेत सिद्धार्थ आणि अनूचे लग्न झाले असले तरी त्यामुळेच खरी मालिकेला कलाटणी मिळाली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण दुर्गाबाईंच्या मनाविरुद्ध लग्न झाले असल्याने अनू आणि सिद्धार्थला वेगळं करण्यासाठी त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसणार आहेत. कदाचित यातूनच त्यांची नकारात्मक भूमिका अधिक खुलत जाईल. हे करत असताना सिद्धार्थवर प्रेम करणारी सान्वी आणि सिद्धार्थचा काका दीनानाथ यांचीही नकारी छटा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सान्वीची आई आजारी असल्याने तिला बरे वाटावे म्हणून सान्वी आणि सिद्धार्थचे लग्न झाले असे सांगण्याची युक्ती सान्वी लढवते. याच प्रसंगाचा फायदा घेत दुर्गाबाई सान्वीला आपल्याच घरी राहायला सांगतात. या बनावाला अनूची संमती असली तरी आगामी भागात हे प्रकरण अनू आणि सिद्धार्थच्या नात्यात अडचणी निर्माण करणार हे मात्र नक्की.

पेशवेकालीन धागा धरून ‘रमा-माधव’ कथा सांगणाऱ्या ‘स्वामिनी’ या मालिकेत सत्तेप्रमाणेच चुलीपुढल्या राजकारणालाही तितकाच वाव दिला आहे. त्यामुळे सत्तेसाठी धडपडणाऱ्या राघोबादादांचे राजकारण एकीकडे, तर कुटुंब आणि पेशवाई या दोन्ही आघाडय़ांवर अंमल राहावा यासाठी गोपिकाबाईंचे सुरू असलेले राजकारण दुसरीकडे. मालिकेत सध्या माधवरावांच्या लग्नाचा घाट दणक्यात सुरू आहे. पण पेशव्यांच्या तोलामोलाची सून न मिळाल्याने गोपिकाबाई सातत्याने रमाला त्रास होईल याची जाणीवपूर्वक दखल घेत आहेत. रमा आणि माधवचे लग्न होणार हे जरी सत्य असले तरी त्या लग्नात रमा आणि तिच्या घरच्यांचा अपमान करण्याची एकही संधी गोपिकाबाई सोडणार नाहीत. आणि हेच येणाऱ्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘घाडगे अ‍ॅण्ड सून’ या मालिकेतील कियारा हे खलनायिकेचं पात्र मालिकेतून गेलं असलं तरी वसुधा मात्र अजूनही कंबर कसून आहे. तर मालिकेत नव्याने झालेली ‘चित्रा’ची एंट्री सध्या नकारात्मक भूमिकेत आहे. पैसे आणि संपत्तीच्या मोहाने आनंदशी लग्न करून घरात आलेल्या चित्राचे खरे रूप अमृतासमोर आले आहे. घाडगेंच्या घरावर डोळा असलेले मनोहर काका आणि चित्रा एकमेकांना सामील असल्याचेही अमृताला समजते. आगामी भागात चित्राचे खरे रूप समोर आणण्यात अमृता समर्थ ठरेल का? किंवा त्यातही चित्राच्या कारस्थानाचाच विजय होईल हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील बदलत्या स्वरूपानुसार खलनायिका असलेल्या नंदिताचेही रूप पालटले आहे. आजवर आपल्या दुटप्पी स्वभावाने भोळ्या राणाला फसवणाऱ्या नंदिताचे खरे प्राताप राजा राजगोंडा म्हणजे राणा पाहत आहे. हा राणाच असल्याची नंदिताला अजून जाणीव झाली नसल्याने तिच्या चुका आणि कारस्थाने राणासमोर उघड होऊ  लागल्या आहेत. परंतु आपणच राणा आहोत हे कळू न देता आगामी भागात राजा राजगोंडा नंदिताच्या कारस्थानावर पाणी टाकणार हे नक्की.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील ‘शनाया’ने आजवर  राधिकाला त्रास देण्यासाठी नाना प्रयत्न केले. आता तर ती राधिकाच्या कंपनीची अर्धी मालकीण होऊ न तिच्या डोक्यावर बसू पाहत आहे. पण राधिका मात्र शिताफीने तिला चुकवून पुढे जाते आहे. शनायाच्या ‘स्मार्ट लूक’ला भाळलेला गुरुनाथ आता राधिकाचा नवा अवतार पाहून पुन्हा तिच्याकडे येणार का, शनायाची यात काय भूमिका असेल आणि हळूहळू सौमित्रच्या प्रेमात पडत चाललेली राधिका सौमित्रचा स्वीकार करेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता तरी गुलदस्त्यात आहेत. पण आगामी भागात पुन्हा एकदा शनायावर मात करण्यात राधिका यशस्वी होणार हे मात्र नक्की. खरे तर, आगामी आठवडय़ात आणखी काय-काय घडणार याची यादी वाढवायची म्हटली तरी त्यात अजून डझनभर खलप्रवृत्तींची नावं समोर येतील. त्यामुळे दसऱ्याच्या निमित्ताने ही ‘खल’बतं मनोरंजनापुरतीच मनावर घेत, त्यातून बाहेर पडण्यासाठी नायक-नायिकांना दुर्गाशक्ती साहाय्यभूत ठरू देत, एवढीच प्रार्थना करू या.