महेश कोठारे यांची ‘विठू माऊली’ ही नवी मालिका

मराठी चित्रपटांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत साय-फाय चित्रपटांची शैली विकसित करणारा दिग्दर्शक म्हणजे महेश कोठारे याबद्दल कोणालाही दुमत असण्याचं कारण नाही. निर्माता म्हणून नव्या भूमिकेत शिरल्यानंतर महेश कोठारे यांनी कौटुंबिक विषयांवरच्या मालिका केल्या. पण ‘झी मराठी’वर त्यांनी आणलेली ‘जय मल्हार’ ही पौराणिक मालिका व्हीएफएक्सची कमाल आणि कलाकारांचा अभिनय या जोरावर दीर्घकाळ चालली. पाठोपाठ त्यांनी ‘कलर्स मराठी’वर ‘गणपती बाप्पा मोरया’ केली. ही मालिकाही लोकांना आवडली. इजा झाला, बिजा झाला आता तिजा म्हणत पुन्हा एकदा ते ‘विठू माऊली’ ही नवीकोरी पौराणिक मालिका घेऊन ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर घेऊन येत आहेत. यापुढे कोठारे पौराणिक मालिकाच करणार का?, हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडणं साहजिक आहे. पौराणिक मालिकांनी सर्वाधिक यश दिलं आहे हे मान्य करत याचा अर्थ तेच करत राहणार असं नाही, हेही कोठारे यांनी स्पष्ट केलं.

वारक ऱ्यांचं श्रध्दास्थान आणि आराध्य दैवत विठ्ठल रखुमाई यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘विठू माऊली’ ही नवीकोरी मालिका येत्या ३० ऑक्टोबरपासून सायंकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाह’वर दाखल होते आहे. याची निर्मिती ‘कोठारे व्हिजन’ने म्हणजेच अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांनी केली आहे. या मालिकेच्या संकल्पनेच्या बोलताना, ‘जय मल्हार’च्या यशानंतर पुढे काय करायचं?, असा प्रश्न पडला होता. ‘कोठारे व्हिजन’ने आतापर्यंत नाविण्यपूर्ण प्रोजेक्ट केले आहेत. यापुढील प्रोजेक्टही असाच हवा, अशी गाठ मनाशी घट्ट बांधली होती, असं ते म्हणतात. नव्या मालिकेच्या विषयाचा विचार करत असतानाच महाराष्ट्राच्या आराध्य दैवतावर विठ्ठलावर कोणीच आतापर्यंत काही केलं नाही हे लक्षात आलं आणि मग आपणच मालिका काढून त्याची शिकवणी व त्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडू असा विचार मनात आल्याचं त्यांनी सांगितलं. ‘समाजाच्या प्रत्येक स्तरातील माणूस विठ्ठलाचा भक्त आहे. विठ्ठलाच्या भक्तांमध्ये गरीब-श्रीमंत असा भेद नाही. प्रत्येकाच्या भावना विठ्ठलाशी जोडलेल्या आहेत. मात्र, अनेकांना विठ्ठलाची कथा माहीत नाही. ती मालिकेतून आम्ही भव्यदिव्य स्वरूपात व्हिज्युअलच्या आधारे दाखवणार आहोत. महाराष्ट्राचं लाडकं दैवत असूनही तितक्या भव्यतेने विठ्ठल महाराष्ट्रापुढे कोणी मांडलाच नाही म्हणून मला ही मालिका करावीशी वाटली. या मालिकेतून विठ्ठलाची कथा, त्याचे पौराणिक संदर्भ जपून, रंजक पद्धतीने आणि तितक्याच भव्यतेने सादर केली जाणार आहे. आमच्या टीमने त्यासाठी पंढरपूरला जाऊन अभ्यास केला आहे. अनेक पोथ्या-पुराणांतून संदर्भ घेतले आहेत. विठ्ठल मंदिराचे विश्वस्त, जाणकार-तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं आहे. या मालिकेतून या दैवताविषयी असलेल्या भावनांना अधिक उंचीवर घेऊन जायचं आहे. त्यासाठी सगळा अभ्यास केला आहे’, असं सांगणाऱ्या कोठारे यांनी  ही मालिका महाराष्ट्र नक्कीच डोक्यावर घेईल असा विश्वास व्यक्त केला आहे.  ‘जय मल्हार’ व ‘गणपती बाप्पा मोरया’ या दोन पौराणिक मालिका केल्यानंतर पुन्हा पौराणिक मालिकाच का?, असा प्रश्न महेश कोठारेंना विचारला असता ते म्हणाले, ‘जय मल्हार’पासून पौराणिक मालिका निर्माण करण्याच्या प्रवासाला सुरुवात केली. इतर मालिकांपेक्षा पौराणिक मालिकांसाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. कारण ती  मालिका कोण्या एका काळाचं प्रतिनिधीत्व करत असते. त्यामुळे त्या काळाला, इतिहासाला कुठेही धक्का न बसता सादर करणं हे मोठं जिद्दीचं व आव्हानात्मक काम असतं. ते आव्हान आम्ही गेले अनेक वर्ष यशस्वीरीत्या पेलत आहोत. याचा अभिमान आहेच आता या दोन मालिकांच्या दांडग्या अनुभवातून आम्ही पौराणिक मालिकांसाठी तयार झालो आहोत. तसेच पौराणिक मालिकांसाठी लागणारं भव्यदिव्य सेट, रचनादेखील आमच्याजवळ तयार आहे. याचाच अर्थ आम्ही यापुढे केवळ पौराणिक मालिकाच करत राहू, असं म्हणण्यात तथ्य नसल्याचं कोठारे सांगतात. पौराणिक मालिका महाराष्ट्रात लोकप्रिय का होतात?, याविषयीचे मत विचारले असता ‘प्रत्येक माणसाचं एक श्रद्धास्थान असतं. प्रत्येक माणूस देवाचा भक्त असतो. त्या देवाच्या जीवन प्रवासाविषयी त्याला जाणून घ्यायचं असतं. त्यातूनच  कुतूहल निर्माण होतं. मालिकेच्या माध्यमातून देवाविषयीचं कथानक दाखवताना ते इतिहासाशी प्रतारणा न करता रंजक पद्धतीनं दाखवावं लागतं. ते दाखवलं की प्रेक्षक त्या मालिकेशी जोडला जातो. आमच्या आधीच्या दोन्ही पौराणिक मालिकांचं कथानक अतिशय सोपं आणि प्रत्येक प्रेक्षकाला डोळ्यासमोर ठेवून मांडण्यात आलं. आम्ही कथानक रंजक पद्धतीनं आणि भव्यतेनं दाखवलं. त्याशिवाय उत्तम वेशभूषा आणि दागिनेही महत्त्वाचे असतात. या सगळ्याचा एकत्रित परिणाम प्रेक्षकांवर होत असल्याने पौराणिक मालिका जास्त लोकप्रिय ठरतात’, असं ते म्हणतात. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे याने या मालिकेचं शीर्षकगीत स्वरबद्ध केलं आहे.

मराठी पौराणिक मालिकांसाठी कपडे आणि ज्वेलरी डिझायनिंग करणं  हे खूप आव्हानात्मक काम असतं. ‘विठू माऊ ली’ या मालिकेसाठी चार्वी खांडके या स्टायलिस्टने वेशभूषा किंवा कपडेपट तर दागिने निलिमा कोठारे व नीता खांडके यांनी डिझाईन केले आहेत. ‘द्वारका आणि दिंडीरवन अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी भगवंत वावरले होते. मग त्या दोन्ही ठिकाणी ते कोणत्या रुपात होते. त्यांचे कपडे कसे होते, अशा बारीकसारीक गोष्टी आम्हाला समजून घ्याव्या लागल्या. व त्यानुसार आम्ही कामाला  सुरुवात केली’, असं नीता खांडके यांनी सांगितलं. ‘विठू माऊ ली’ या मालिकेसाठी काम करताना तसं काही संदर्भसाहित्य उपलब्ध नव्हतं. केवळ पोथ्या आणि पुराणातील संदर्भांनुसार आम्हाला काम करावं लागलं. ‘जय मल्हार’ या मालिकेतील आम्ही डिझाईन केलेल्या दागिन्यांची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती. स्वाभाविकच या मालिके च्या बाबतीत आमच्याकडून त्यांच्या मोठय़ा अपेक्षा असणार हे साहजिक आहे. हे लक्षात घेऊन भव्यता आणतानाच त्यातील वास्तवताही जपण्याचा प्रयत्न केला आहे, असं त्या म्हणाल्या. ‘प्रत्येक व्यक्तिरेखेचे दागिने , कपडे यावर विशेष मेहनत घेऊ न त्यांना न्याय देण्यात आला आहे. विठ्ठलासाठी पिवळे पितांबर न वापरता सोनेरी आणि क्रीम रंगाचं धोतर व त्याला साजेशा उठावदार रंगाचा शेला देण्यात आला आहे. त्यावर पारंपरिक कर्णकुंडले व मुकुट आहेच परंतु जोडीला मोत्यांचे दागिने देण्यात आले आहेत. रुक्मिणी ही विदर्भातली असल्याने तिचा लुक महाराष्ट्रीयच ठेवण्यात आला आहे. तिच्या दागिने आणि कपडय़ांमध्ये पारंपरिक मराठीपण आहे. तसंच ती द्वारकेत असताना तिच्यासाठी उठावदार रंग आणि जेव्हा ती दिंडीरवनात येते, तेव्हा तिचा भाव व्यक्त करण्यासाठी पेस्टल शेडचे कपडे दिले आहेत. सत्यभामा ही व्यक्तिरेखा थोडीशी भडक, उत्साही असणं अपेक्षित आहे. त्यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी दिसावी यासाठी खास सोन्याचे दागिने डिझाईन करण्यात आले आहेत. तिचे कपडे हे उठावदार रंगांचे विशेष पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहेत. तर राधा या उत्तरेकडे निवास करणाऱ्या व्यक्तिरेखेसाठी पारंपारिक घागरा-चोळी आधुनिक डिझाइनची संजीवनी देण्यात  आल्याचे त्यांनी सांगितले.

या मालिकेत आपल्याला अनेक नवे चेहरे पहायला मिळणार आहेत. यात विठ्ठलाच्या भूमिकेत अजिंक्य राऊ त, रुक्मिणीच्या भूमिकेत एकता लबडे, सत्यभामाच्या भूमिकेत बागेश्री निंबाळकर आणि राधाच्या भूमिकेत पूजा कातुर्डे हे कलाकार दिसणार आहेत. त्याशिवाय इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये अनुभवी कलाकारही आहेत. मालिकेची पटकथा संतोष अयाचित आणि पराग कुलकर्णी यांची आहे. मालिकेचे शीर्षकगीत आदर्श शिंदे यांनी गायले आहे.