गुन्हेगारी या विषयावर आधारित ‘आर्या’ या वेब मालिकेचा तिसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या वेब मालिकेत सुष्मिता सेनचा आगळावेगळा अंदाज दिसून येतो. यापूर्वी ‘आर्या’ या मालिकेच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यात सुष्मिताबरोबरच अभिनेता विकास कुमारने साकारलेल्या एसीपी खानच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. राम माधवानी दिग्दर्शित या वेब मालिकेतील प्रसंग, चुरस लक्षवेधी आहेच, आता नव्या पर्वात एसीपी खान तिला कसं थांबवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे आर्याच्या आयुष्यात काय बदल होतात याबरोबरच एकंदरीत आजवरच्या वाटलाचीविषयी विकासने ‘लोकसत्ता’बरोबर संवाद साधला. त्यावेळी त्याने मराठी चित्रपटात काम करण्याची त्याची इच्छा असल्याचं आवर्जुन सांगितलं.
‘सीआयडी’ ते ‘आर्या’
‘सीआयडी’मधील रजत या पात्रापासून माझी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, तर ‘आर्या’ या वेब मालिकेतील एसीपी खान या पात्रामुळे मला ओळख मिळाली. मला आजही अनेक लहान शहरांमध्ये रजत म्हणून ओळखले जाते. सीआयडीमध्ये प्रत्येक भागात एक प्रकरण सोडवलं जातंच. पण ‘आर्या’ या वेब मालिकेत असं होत नाही. या वेब मालिकेत एक पोलीस अधिकारी म्हणून माझी भूमिका आहेच, या मालिकेची नायिका आर्याबरोबर माझं एक भावनिक गुंतागुंतीचंही नातं आहे. या गुन्हेगारी विश्वात आर्याने जाऊ नये असं त्याला वाटतं आणि त्या दृष्टीने तो तिला नेहमी थांबवण्याचा प्रयत्न करतो. या माझ्या भूमिकेबद्दल माझं कौतुकही होतं आहे, असं विकासने सांगितलं.
हेही वाचा >>>“बाळाचं संगोपन एकटी करतेस का?”, चाहत्याला उत्तर देत इलियाना डिक्रुझने शेअर केला ‘तो’ फोटो, गर्भधारणेविषयी म्हणाली…
१९९४ साली अभिनेत्री सुश्मिता सेन यांनी देशातील पहिली विश्वसुंदरी हा मान मिळवला होता. तेव्हापासून ती अनेक तरुणांची आदर्श आहे. सुश्मिता सेन यांची अभिनय क्षेत्रातील वाटचाल, तिचं दमदार व्यक्तिमत्त्व अशा अनेक बाबतीत सरस असलेल्या अभिनेत्रीबरोबर काम करायला मिळालं याचा आनंद या वेब मालिकेने दिल्याचंही त्याने सांगितलं. अभिनेता म्हणून विकास स्थिरावला असला तरी लहानपणापासून त्याला अभिनयाची आवड नव्हती. ‘मला डॉक्टर बनायचं होतं. त्याची तयारी सुरू असताना मी माझ्या मित्राबरोबर फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपट पाहायला जायचो. त्यावेळेपासून हळूहळू चित्रपटाची आवड निर्माण होऊ लागली. त्या वेळी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा खऱ्या अर्थाने आपणदेखील अभिनय क्षेत्रात काम करायचं हे ठरलं. त्यानंतर काही नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. शाहरुख खानचे गुरू बॅरी जॉन यांच्याकडून अभिनयाचे धडे घेतले. नंतर मुंबईत आल्यावर ‘पावडर’ आणि ‘खोटा सिक्का’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं आणि तिथून पुढे काम मिळत गेलं, पण मला खऱ्या अर्थाने ओळख ‘आर्या’ या वेब मालिकेमुळे मिळाली.’
मला अनेक जण म्हणतात माझा चेहरा मराठी माणसासारखा आहे, पण माझी मराठी तेवढी उत्तम नाही. जर मला माझी मराठी भाषा सुधारून काम करण्याची संधी मिळाली तर मी नक्की मराठी चित्रपटांमध्ये काम करेन. मराठीमधील ‘किल्ला’ हा चित्रपट खूप जास्त आवडतो. त्या चित्रपटाचं सादरीकरण आणि त्यात दाखवलेला साधेपणा खरंच कौतुकास्पद आहे.
विकास कुमार