संजय लीला भन्साळींच्या ‘राम-लीला’ चित्रपटाचे ‘नगाडा संग ढोल’ आणि ‘लहू मुह लग गया’ या दोन गाण्यांचे व्हिडिओ प्रसिद्ध होताच त्यांना अल्पवधीत प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता चित्रपटकर्त्यांनी ‘इश्क्याव ढिश्क्याव’ गाण्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या गाण्यात चित्रपटातील प्रमुख जोडी रणवीर आणि दीपिका धमाल मस्ती करताना दिसतात. या आधी प्रसिद्ध झालेल्या दोन गाण्यांपेक्षा हे गाणे हटके असून, यात चित्रपटाच्या टॅग-लाईनप्रमाणे राम आणि लीलाच्या प्रेमाचा एक आक्रमक तडका पाहायला मिळतो. संजय लिला भन्साळी यांनी गुजराती गरबा आणि दांडियाला बाजूला सारत अस्सल बॉलिवूड स्टाईलला प्राधान्य दिले आहे. या गाण्याचे बोल सिद्धार्थ-गरिमा यांचे असून, संगीत संजय लिला भन्साळी यांचे आहे. ‘राम-लीला’ चित्रपटात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत असून, रिचा चढ्ढा, सुप्रिया पाठक, गुलशन देवै, अभिमन्यू शेखर सिंग, श्वेता साळवे, बरखा बिस्त सेनगुप्ता आणि शरद केळकर यांच्यासुद्धा भूमिका आहेत. ‘राम-लीला’ १५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.