बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती नेहमीच चर्चेत असते. यावेळी ती गायकांच्या मानधनामुळे चर्चेत आहे. “बॉलीवूडमधील गायकांना पुरेसे मानधन मिळत नाही. पैसे कमावण्यासाठी त्यांना इतर कामे करावी लागतात.” असा खळबळजनक दावा नेहाने केला आहे.

नेमक काय म्हणाली नेहा?

एनडीटिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार नेहा म्हणाली, “अनेकांना वाटतं की बॉलिवूडमध्ये गाणं गायल्यानंतर खुप पैसे मिळतात. कोट्यवधींच्या चित्रपटांमध्ये लाखो रुपयांचे मानधन गायकांना दिले जाते. मात्र या निव्वळ अफवा आहेत. काही ठराविक गायक सोडले तर कोणालाही पुरेसे मानधन मिळत नाही. एखादं गाणं सुपरहिट झालं तरच अतिरिक्त पैसे मिळतात. मग अशा वेळी गायक खासगी शो किंवा लाईव्ह इव्हेंट करुन पैसे मिळवतात. अनेक जण लग्न किंवा पार्टीमध्ये देखील गाताना दिसतात. काही लोक त्यांची खिल्ली उडवतात मात्र त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नसतो.” असा दावा नेहाने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

नेहा आपल्या वादग्रस्त विधानांसोबतच डान्स आणि कॉमेडीसाठीही प्रसिद्ध आहे. तिचे इन्स्टाग्राम आणि टिक-टॉक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. नेहा गेल्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणमुळे चर्चेत होती. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत असं म्हटलं जात होतं.