सध्या सोशल मीडियावर मीम्सपासून रिल्सचा विषय ठरलेलं आणि नेटिझन्सच्या पसंतीस उतरलेलं गाणं म्हणजे मानिके मांगे हिते. हे गाणं श्रीलंकेची गायिका योहानी हिने गायलं आहे. हे गाणं गातानाचा तिचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तिचं हेच गाणं आता बॉलिवूड अभिनेता सलमान खान गाताना दिसत आहे.
बिग बॉस सीझन १५ या रिएलिटी शोमध्ये योहानीने हजेरी लावली. या शोचा सूत्रनिवेदक सलमान खान याच्यासोबत ती गाताना दिसत आहे. योहानी त्याला तिचं प्रसिद्ध मानिके मांगे हिते हे गाणं शिकवत आहे. सलमान योहानीच्या मागोमाग हे गाणं म्हणत आहे. मात्र अनेक शब्द उच्चारण्यात त्याला अडचण येत आहे. बिग बॉसच्या प्रोमोमध्ये हा प्रसंग दाखवण्यात आला आहे. कलर्स टीव्ही या वाहिनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.
योहानीने बिगबॉसच्या सेटवर हजेरी लावली. त्याचबरोबर ती बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिलाही भेटली. जॅकलिनसोबतचे फोटो योहानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.