बॉलीवूडचा मि. परफेक्टशनिस्ट आमिर खान हा गंभीर व्यक्तिमत्व असलेला अभिनेता समजला जातो. पण फार कमीच जणांना तो ख-या आयुष्यात खूप खोडकर असल्याचे माहित असेल. बॉलीवूड विश्वात तो ‘प्रॅन्कस्टर’ म्हणून प्रसिद्ध आहे. या अभिनेत्याला आपल्या सहअभिनेत्रींच्या हातावर थुंकण्याची सवय आहे. त्याच्या या सवयीचा अनुभव आजवर अनेक अभिनेत्रींना आला आहे. मात्र, आमिर असे का करतो याचे उत्तर कोणालाच माहित नाही. याचाच उलगडा खुद्द आमिरनेच केला. १८व्या ‘मामि’ चित्रपट महोत्सवाला ९०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या ‘जो जिता वही सिंकदर’ चित्रपटाच्या टीमने उपस्थिती लावली होती. त्याचवेळी आमिरसोबत या चित्रपटात काम करणारी नृत्य दिग्दर्शिका फराह खान हिने त्या जुन्या आठवणीला उजाळा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘जो जिता वही सिंकदर’मधील टीम ‘मामि’ चित्रपट महोत्सवाला उपस्थित होती. त्यावेळी फराह खान म्हणाली की, आमिरला त्याच्या सहअभिनेत्रींच्या हातावर थुंकण्याची सवय आहे. तो अजूनही असे करतो. मला तुझा हात बघू दे.. असे सांगत तो लगेच हातावर थुंकतो. यावर लगेचच उत्तर देत आमिर म्हणाला की, मी ज्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकले त्या नंबर वन झाल्या. आमिरने असे उत्तर देताच चित्रपटातील त्याची सहअभिनेत्री पूजा बेदी ही बोलण्यासाठी पुढे सरसावली. ‘माझी मुलगी आलिया हिला मी आमिर अंकलची भेट घे म्हणून सांगणार आहे. त्यावेळी त्याने तुझ्या हातावर थुंकणे गरजेचे आहे,’ असे ती हसत म्हणाली. यावेळी दीपक तिजोरी, आएशा झुल्का, मामिक सिंग आणि इमरान खान हेदेखील उपस्थित होते.

गेल्या २४ वर्षांत ब-याच गोष्टी बदलल्या आहेत. याविषयी बोलताना आमिर म्हणाला की, २४ वर्षात बरंच काही बदललं आहे. माझं लग्न तुटलं. त्यानंतर मी पुन्हा लग्न केलं. अजून काय? असे तो विनोदबुद्धीने म्हणाला. लवकरच आमिर खान हा नितेश तिवारी दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा ‘दंगल’ चित्रपटात झळकणार आहे. ‘दंगल’ या वर्षी २३ डिसेंबरला प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whenever i spit on a heroines hand she becomes number one aamir khan
First published on: 25-10-2016 at 12:29 IST