ऋषभ शेट्टीचा कांतारा चॅप्टर १ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. पंजुर्ली आणि गुलिगा या दोन देवतांचा यामध्ये उल्लेख आला आहे. याआधीचा कांतारा द लिजेंड हा चित्रपटही चर्चेत राहिला होता. या चित्रपटानेही प्रेक्षकांची मनं जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता कांतारा चॅप्टर १ या चित्रपटाची चर्चा सातत्याने होते आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या पंजुर्ली आणि गुलिगा यांच्याबाबत आपण जाणून घेऊ.
पंजुर्ली देव कोण आहे?
कांतारा चित्रपटातल्या एका गाण्याने सगळ्यांची मनं जिंकली होती. ते गाणं होतं वराह रुपम. वराह हा विष्णुचा अवतार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. कांतारा द लिजेंडमध्ये पंजुर्ली आणि भुता कोला प्रथा दाखवण्यात आली होती. दक्षिणेत पंजुर्ली देवावर श्रद्धा ठेवली जाते. पंजुर्ली देवाला जमीन आणि शेतीचं रक्षण करणारा देव म्हणून मान्यता आहे. सुख, समृद्धी आणि भरभराट यांचा आशीर्वाद पंजुर्ली देव देतो असं दक्षिणेत मानलं जातं. पंजुर्ली देवाबाबत अनेक दंतकथा आहेत. काही कथांनुसार पंजुर्ली देव हा विष्णुचा वराह अवतार आहे. पंजुर्लीची वेशभुषा पाहिली तर लक्षात येतं की पंजुर्लीच्या डोक्यावर जो मुकुट आहे त्याच्यावर वराह आहे. कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये पंजुर्लीची पूजा केली जाते आणि भूता कोला हा उत्सवही साजरा केला जातो. पंजुर्लीचा वेश घेणाऱ्या लोकांमध्ये दैव अर्थात पंजुर्ली संचारतो अशी श्रद्धा आहे. एका कथेनुसार कैलास पर्वतावर एक रानडुकराच्या मृत्यूनंतर त्याचं पिल्लू अनाथ झालं. देवी पार्वतीला त्या पिल्लाची दया आली. तिने त्या पिल्लाला मांडीवर घेतलं आणि पंजुर्ली हे नाव त्याला दिलं. पंजुर्ली जंगलाचा रक्षक आहे अशीही मान्यता आहे. पंजुर्ली या देवाबाबत जशा दंतकथा आहेत तशाच गुलिगाबाबतही आहेत.

गुलिगा कोण आहे?
गुलिगा देवाची निर्मिती शंकराकडून झाली अशी एक मान्यता आहे. भगवान शंकराने एक दगड फेकला त्यातून गुलिगा जन्माला आला असं मानलं जातं. गुलिगा हा उग्र देव आहे असंही मानलं जातं. दक्षिण कर्नाटकातील संस्कृतीनुसार गुलिगाचा जन्म हा शंकरामुळे त्याच्या भस्मामुळे झाला आहे अशीही मान्यता आहे. दक्षिणेत सांगितल्या जाणाऱ्या एका दंतकथेनुसार देवी पार्वतीला भस्माचा एक विचित्र दगड दिसला. जेव्हा हा दगड त्यांनी भगवान शंकराच्या हाती दिला तेव्हा त्यांनी तो दगड खाली फेकला. तो फुटून त्यातून गुलिगा जन्माला आला असंही सांगितलं जातं.

गुलिगा हा उग्र देव म्हणून प्रसिद्ध आहे
गुलिगा हा रक्षणकर्ता आणि उग्र देव आहे. भगवान विष्णुच्या रक्षणासाठी म्हणजेच पंजुर्लीच्या रक्षणासाठी गुलिगाला पाठवलं गेलं अशीही मान्यता दक्षिणेत आहे. गुलिगाने विष्णुलोकात उत्पात माजवला होता अशाही कथा सांगितल्या जातात. विष्णुने गुलिगाला शाप दिला आणि पृथ्वीवर पाठवलं अशीही कथा सांगितली जाते. पंजुर्ली गुलिगा यांच्यात युद्ध झालं होतं ते थांबलं नाही तेव्हा दुर्गा देवीने येऊन ते युद्ध थांबवलं आणि त्यांना सतत एकत्र राहा असं सांगितलं तेव्हापासून पंजुर्ली आणि गुलिगा यांची पूजा एकत्र करण्यास सुरुवात झाली आणि गुलिगा हा पंजुर्लीचा रक्षक झाला असंही मानलं जातं. कोला उत्सवात पंजुर्ली आणि गुलिगा यांचं रुप घेऊन अनेकजण नाच करतात आणि दोघांच्या मैत्रीतलं दर्शन घडवतात. टाइम्स नाऊने हे वृत्त दिलं आहे.
पंजुर्ली आणि गुलिगा असे दोन्ही देव कांतारा चित्रपटात दाखवण्यात आले आहेत
कांतारा चित्रपटात पंजुर्ली आणि गुलिगा असे दोन्ही देव दाखवण्यात आले आहेत. दंतकथांमध्ये सांगितल्यांप्रमाणे पंजुर्ली हा सौम्य स्वरुपाचा देव आहे तर गुलिगा उग्र आहे. कांतारामध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे गुलिगा हा कठोर आहे, उग्र आहे तसंच तो शिस्तप्रिय आहे. तो चुकांना माफी देत नाही तर तो शिक्षा करतो. कुणीही अन्यायाने वागलं तर त्याला शिक्षा कऱण्याचा अधिकार गुलिगाला आहे. गुलिगामुळे वाईटाचा नाश होतो अशीही श्रद्धा आहे. त्याला स्वामी गुलिगा असंही म्हटलं जातं.