Lakshmi Menon मल्याळम अभिनेत्री लक्ष्मी मेननवर आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका तरुणाने मारहाणीचा प्रयत्न आणि अपहरण यासंदर्भातले आरोप केले आहेत. अभिनेत्री लक्ष्मी मेनन सध्या फरार आहे. या प्रकरणातील चार पैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर लक्ष्मी मेननचा यामध्ये सहभाग आहे का? याचा शोध पोलीस त्यांच्या पद्धतीने करत आहेत. या घटनेला दोन दिवस उलटूनही अभिनेत्री लक्ष्मी मेनन फरार आहे.
नेमकी घटना काय घडली? लक्ष्मी मेननवर आरोप काय?
मनोरमाच्या वृत्तानुसार कोची या ठिकाणी असलेल्या रेस्तराँ आणि बार मध्ये रविवारी रात्री एक घटना घडली. या घटनेत आयटी क्षेत्रात काम करणारा तरुण आणि त्याचा मित्र यांचा वाद लक्ष्मी मेनन आणि तिच्या मित्रांशी त्यानंतर हे दोन्ही ग्रुप निघून जाऊ लागले. पण या तरुणाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी आणि त्याच्या इतर मित्रांनी बळजबरीने कारमध्ये कोंबण्याचा प्रय़त्न केला. एर्नाकुलम या ठिकाणी असलेल्या रेल्वे ब्रिजजवळ येईपर्यंत त्याला मारहाण आणि शिवीगाळ झाली. ज्यामध्ये लक्ष्मी मेनन आणि तिच्या सहकाऱ्यांचा सहभाग होता. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यांची नावं अनुक्रमे मिथुन, अनिश आणि सोनमोल अशी आहेत. या सगळ्यांवर अपहरण, चुकीच्या उद्देशाने गाडी चालवणे, शिवीगाळ करणे यासंदर्भातले गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर अभिनेत्री लक्ष्मी मेननचा शोध सुरु करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी याबाबत काय माहिती दिली?
पोलीस सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्यांचा वाद रेस्तराँमध्ये सुरु झाला पण तो तिथे संपला नाही. तक्रारदार तरुणाला कारमध्ये बळजबरीने नेण्यात आलं. त्यानंतर त्याला मारहाण केली गेली आणि शिवीगाळ करण्यात आली. वेदीमारा येथील पेरावुर या भागात येईपर्यंत हा प्रकार सुरु होता. लक्ष्मी मेननशी आम्ही संपर्क करण्याचा प्रय़त्न करतो आहोत. तिचा फोन स्विच ऑफ आहे. तसंच तिने या घटनेनंतर पळ काढला आहे. आम्ही तिचा शोध घेऊ, तिचा सुगावा लागला की तिला असेल तिथून अटक करु असंही पोलीस सूत्रांनी म्हटलं आहे.
कोण आहे लक्ष्मी मेनन?
मल्याळम अभिनेत्री लक्ष्मी मेननचा जन्म कोचीमध्ये झाला आहे. विनयन यांच्या २०११ मध्ये आलेल्या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत तिचं मोठं नाव आहे. कुमाकी हा तिचा गाजलेला चित्रपट आहे. तसंच तिने २०१२ पासून अनेक चित्रपटांसाठी बक्षीसंही जिंकली आहेत. लक्ष्मी तिच्या उत्तम भूमिकांसाठी ओळखली जाते. पण आता मारहाण आणि अपहरण प्रकरणात तिचा शोध पोलीस घेत आहेत.