वादग्रस्त विनोदी कलाकार तन्मय भट्टने १९ महिन्यात १०९ किलो वजन कमी करुन वजनदार व्यक्तींना आत्मविश्वास देणारा कारनामा केला आहे. तन्मयने आपल्या तंदुरुस्तीसाठी ३ महिन्यांच्या टप्प्यामध्ये वजन कमी करण्याचे नियोजन केले आहे. १०९ किलो वजन कमी करुन त्याने नियोजनबद्धरित्या आपले वजन कमी करत असल्याचे दाखवून दिले आहे. वजन कमी करण्यासाठी केवळ कलाकारच नाही तर अनेकजण कसरती करत असतात. वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी डायट कमी करणे, कसरतीचा आधार घेणे असे अनेक उपाय केले जातात. यामध्ये सर्वात महत्त्वाचे असते ते नियोजन. योग्य नियोजनाने असाध्य गोष्ट साध्य करता येऊ शकते. हेच तन्मयने दाखवून दिले आहे.
भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचा अपमानास्पद व्हिडिओ तयार केल्यामुळे तन्मय चर्चेत आला होता. तन्मय भट्टच्या वादग्रस्त व्हिडिओनंतर नेटीझन्सनीही त्याची चांगलीच फिरकी घेतली होती. शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत त्याला रुग्णाची उपमा दिली होती. प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहऱ्यांची थट्टा करणाऱ्या या कलाकाराला चाबकाने फटकारले पाहिजे, असे शिवसेनेने म्हटले होते. तन्मय भट्टच्या वादग्रस्त व्हिडिओवर देशभरात चांगलीच चर्चा रंगली होती. त्याने लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर बनवलेल्या वादग्रस्त व्हिडिओवर विनोदी कलाकार गौरव गेरा याने आपल्या अंदाजात तन्मयला चपराक लगावली होती. लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांची खिल्ली उडवणाऱ्या तन्मयने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांकाची देखील खिल्ली उडवली होती. ट्विटरवरुन तन्मयने प्रियांकाच्या नावावरुन तिची खिल्ली उडवली. प्रियांकाने देखील त्याला सडेतोड उत्तर दिले होते.
वजन कमी करुन थक्क करणारा तन्मय पहिला सेलिब्रिटी नाही. यापूर्वी उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने आपले वजन कमी करुन अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. अतिलठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या अनंत अंबानीने चक्क १८ महिन्यांत १०८ किलो वजन घटवलं होते. त्याच्या नव्या लूकची खुद्ध सलमान खानने प्रशंसा केली होती. १८ महिन्यात १०८ किलो वजन कमी करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते. मला त्याचा आदर वाटतो. असे ट्विट सलमान खानने केले होते. भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी यानेदेखील शिस्त आणि निर्धाराने अनंतने वजन कमी केल्याबद्दल त्याची प्रशंसा केली.