आमिर खान म्हणजे बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’. त्याची प्रत्येक गोष्ट हटके असते. आपणच काय पण, त्याचे इतर सेलिब्रिटी मित्रपरिवारही कल्पना करू शकत नाही इतक्या भन्नाट कल्पना आमिरकडे असतात. त्याचे चित्रपट, त्यानं साकारलेल्या भूमिका, कथा, त्याची विविध रुपं, समाजासाठी तो राबवत असलेले उपक्रम हे सारं काही वेगळंच आहे. कोणत्याही रिअॅलिटी शो किंवा अवॉर्ड शोमध्ये त्याचं न जाणं, अनेकदा प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणं त्याचं हे वागणं त्याला इतर सेलिब्रिटींपेक्षा नेहमीच वेगळं ठरवत असतं. त्याचं हेच वेगळेपण त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटबाबतही प्रकर्षानं दिसून आलं.
वाचा : मोठ्या मनाचा ‘बाजीराव’, चाहत्यानं भेट दिलेल्या चित्राला रणवीरनं दिलं घरात स्थान
आमिरनं ५३ व्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यानं आपल्या आईचा फोटो पोस्ट केला होता. ‘आज मी जो आहे ते केवळ आणि केवळ तिच्यामुळेच आहे’ असं लिहित आमिरनं आपल्या आयुष्यातील खास व्यक्ती समोर आणली. त्यानंतर आईच्या फोटोंची कोलाज पोस्ट हटवत आमिरनं त्याच जागी मुलगा आझादचा फोटो शेअर केला. आझादच्याही फोटोंचं कोलाज हटवत आमिरनं काही तासांपूर्वी नवी पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये आमिर काही शालेय विद्यार्थ्यांसोबत होता. सलग दुसऱ्यांदा आमिरनं आपले फोटो हटवले आहेत. तिन्ही वेळा आमिरनं एकूण नऊ फोटोंचं कोलाज शेअर केलं. त्यामुळे नऊ फोटोंचं कोलाज टाकण्यामागे आमिरचं नेमकं कारण काय आहे हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. अर्थात तो मिस्टर परफेक्शनिस्ट आहे आणि प्रत्येक गोष्ट हटके करण्यात आमिरचा हात कोणताही सेलिब्रिटी धरू शकत नाही त्यामुळे यामागे काहीतरी कारण असणार हे नक्की!
वाचा : बनावट आधार कार्ड वापरून उर्वशी रौतेलाची फसवणूक
पण आमिरनं मात्र अजूनही यावर मौन सोडलं नाही. इन्स्टावर अनेक सेलिब्रिटी आहेत पण कोणीही आमिरसारखा हटके फंडा वापरला नाही. म्हणूनच बॉलिवूडच्या सगळ्या सेलिब्रिटींपेक्षा आमिरचं अकाऊंट सगळ्यात हटके ठरलं आहे.