‘अंदाज अपना अपना’ हा चित्रपट बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला होतो. या चित्रपटातील “मै तो कहता हूँ आप पुरुष ही नही है…. महापुरुष है महापुरुष”, “गलतीसे मिस्टेक हो गया”, “तेजा मै हू मार्क इधर है” असे काही प्रसिद्ध डायलॉग्स आजही ओठांवर आहेत . ४ नोव्हेंबर १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

गंमतीशीर बाब म्हणजे आत्ताच्या घडीला या चित्रपटातील अमर प्रेमची जोडी, रवीना- करिश्माचा भाभडेपणा, क्राइम मास्टर गोगो, तेजा, भल्ला, राबर्ट यांची प्रचंड स्तुती केली जाते. मात्र, २५ वर्षांपूर्वी या चित्रपटाची गणना सर्वाधिक फ्लॉप चित्रपटांमध्ये केली जात होती. आमिर खान, सलमान खान, करिश्मा कपूर, रविना टंडन यांसारख्या दमदार अभिनय करणाऱ्या मल्टीस्टार्सने भरलेल्या ‘अंदाज अपना अपना’ने पहिल्या तीन आठवड्यात केवळ तीन कोटी रुपयांची कमाई केली होती.

या पाच कारणांमुळे ‘अंदाज अपना अपना’ झाला होता फ्लॉप

  • विनय सिन्हा या चित्रपटाचे निर्माते होते. आर्थिक टंचाईमुळे तब्बल तीन वर्ष या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. १९९१ साली त्यांनी चित्रीकरणास सुरुवात केली व १९९४ साली चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रदर्शित होण्यास इतका उशीर झाला, की त्यामुळे निर्मात्यांना प्रमोशनसाठी केवळ तीनच आठवडे मिळाले होते. प्रमोशनच्या कमतरतेमुळे निर्मात्यांना या चित्रपटाबाबत अपेक्षित वातावरण निर्मिती तयार करता आली नाही.
  • बॉलिवूड चित्रपटांच्या यशामागे त्यातील म्युझिकचा सिंहाचा वाटा असतो. किंबहूना ज्या बॉलिवूडपटामध्ये दमदार म्युझिक नसते, ते चित्रपट फ्लॉप समजले जातात. याच पार्श्वभूमीवर फ्लॉप म्यूझिकमुळे ‘अंदाज अपना अपना’ देखील फ्लॉप झाला.
  • त्याकाळी ‘हम आपके है कौन’, ‘मोहरा’, ‘क्रांतिवीर’ आणि ‘राजाबाबू’ या चार चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये हवा होती. या हवेत ‘अंदाज अपना अपना’ हरवून गेला.
  • ‘अंदाज अपना अपना’ त्या काळातील इतर चित्रपटांच्या तुलनेत लवकर होम व्हिडीओ कॅसेटवर उपलब्ध केला गेला. त्यामुळे उर्वरीत प्रेक्षकांनी चित्रपटाला घरबसल्यास पाहाणे पसंत केले.
  • या चित्रपटात प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावणारी कॉमेडी आहे. मात्र, त्याकाळातील प्रेक्षकांसाठी हा प्रयोग नवा होता. आणि या नव्या प्रयोगाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.