Firing at Kapil Sharma’s Cafe : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर महिन्याभरात दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. कपिल शर्माच्या या कॅफेचं नाव ‘कॅप्स कॅफे’ असं असून या कॅफेवर दुसऱ्यांदा झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. या गोळीबाराच्या घटनेत कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. कपिल शर्माचा हा कॅफे ८५ अव्हेन्यू आणि स्कॉट रोडच्या चौकात आहे. या कॅफेवर झालेल्या गोळीबारात खिडक्यांना छिद्र पडल्याची माहिती सांगितली जात आहे.
कपिल शर्माच्या कॅफेवरील गोळीबाराबाबत आता लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून मोठा खुलासा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात सोशल मीडियावर एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. सलमान खानबरोबर जवळीक वाढल्याच्या कारणावरून कपिल शर्माच्या कॅफेवर हल्ला करण्यात आल्याचं कारण समोर आलं आहे. या संदर्भातील वृत्त जनसत्ताने दिलं आहे.
दरम्यान, कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीचा एक सदस्य थेट धमकी देताना ऐकू येत आहे. “सलमान खानसोबत काम करणाऱ्या प्रत्येकाचं असंच होईल”, असं म्हणताना ऐकू येत आहे. दरम्यान,लोकसत्ता या कथित ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. मात्र, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या या सदस्यानं हल्ल्याचं कारण सांगताना म्हटलं की, “कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करण्यात आला, कारण त्याने सलमान खानला त्याच्या कॅफेच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केलं होतं.”
सोशल मीडियावरील पोस्टही चर्चेत
लॉरेन्स बिश्नोई गँगमधील एका सदस्याकडून सोशल मीडियावर पोस्ट करत कथितपणे या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. पोस्टमध्ये लिहिलं की, “जय श्री राम, सत श्री अकाल, सर्व भावांना राम-राम. कपिल शर्माच्या सरे येथील कॅप्स कॅफेवर जी फायरिंग झाली त्याची जबाबदारी गोल्डी ढिल्लों आणि लॉरेन्स बिश्नोई गँग घेते. आम्ही त्याला फोन केला होता, पण त्याने फोन उचलला नाही, त्यामुळे कारवाई करावी लागली. जर अता देखील उत्तर मिळालं नाही तर पुढील अॅक्शन लवकरत मुंबईमध्ये होईल,” असं त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
दरम्यान, गुरूवार सकाळी झालेल्या हल्ल्यावेळी किमान सहा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी सरे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, १० जुलै रोजी याच कॅफेवर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) ऑपरेटीव्ह हरजित सिंग लड्डी याने घेतली होती, अशीही माहिती सांगितली जात आहे.