मना सर्वथा नीती सोडू नको हो, या चरणाचा गूढार्थ असा सद्गुरू बोधाशी एकरूप करणारा आहे. चौथ्या श्लोकाचा यापुढचा आणि अखेरचा चरण म्हणजे, मना अंतरीं सारवीचार राहो।। हे मना सदोदित सार काय आणि असार काय, याचा विचार करीत राहा. या ‘सारवीचार’ शब्दाचीही फार मार्मिक उकल काणे महाराजांनी ‘आत्मदर्शन’ या ग्रंथात केली आहे. त्यांच्या सांगण्यानुसार ‘सार विचार’ म्हणजे अंतरात नामाचा सारखा विचार अर्थात नामानुसंधान! भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्या विवरणाच्या आधारे प्र. ह. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘मनोबोधामृत’ या ग्रंथात या अर्थाचे आणखी एक जोडपाऊल टाकले आहे! कुलकर्णी यांच्या सांगण्यानुसार, अंत:करणात नामस्मरण चालू आहे की नाही याबरोबरच त्या नामाची प्रचीती आहे की नाही, हे पाहत राहणे हाच सार विचार, अशी या शब्दाची उकल आहे! म्हणजे नाम चालू आहे की नाही, इकडेच फक्त लक्ष ठेवायचं नाही तर त्या नामाची प्रचीती येत आहे की नाही, याकडेही लक्ष ठेवायचं आहे! आता या दोन्ही व्याख्यांच्या प्रकाशात मना अंतरीं सारवीचार राहो।। या चरणाचा थोडा विचार करू. आता कुणाला वाटेल, अंतरंगात नामस्मरण चालू आहे की नाही, याचा विचार हाच, ‘सार काय आणि असार काय,’ हा विचार कसा होऊ शकतो? थोडा बारकाईनं विचार केला तर जाणवेल की जगाच्या विचारांत मन भरकटतं तेव्हा मनातून नाम सुटलेलंच असतं. आता ही गोष्टही खरी की मनात नाम आणि जगाचे विचारही एकाचवेळी असू शकतात. पण त्यावेळीही नामाभ्यास चिकाटीनं करीत राहिलो तर जगाचे विचार हळूहळू कमी होत जातात. मन हे जगाच्या, प्रपंचाच्या विचारानं सदोदित हिंदकळत असतं. ‘प्रपंच’ या शब्दाचाही गूढार्थ आपण आधी अनेक सदरांमध्ये जाणला आहे तो असा की पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं याद्वारे जगाकडे असलेली ओढ म्हणजेच प्रपंच! तर मन सदोदित अशा प्रपंचविचारांत गुरफटलं असतं. त्या विचारांच्या झंझावातावर नाम हा एक उपाय आहे. नाम हा शब्द मनाच्या विरुद्धच आहे ना! मनाला उलट केलं की नाम हाच शब्द येतो! तेव्हा मनाचं अनंत ठिकाणी विखुरणं, अडकणं नामामुळेच कमी होऊ लागतं. तेव्हा अंत:करणात नामाचा विचार सुरू आहे की नाही, याचा विचार म्हणजेच अंत:करणात जगाचा विचार सुरू आहे का, याचा धांडोळा घेणं आहे. जर अशाश्वताच्या विचारात मन गुरफटलं आहे, हे समजलं तरच त्या विचारातून बाहेर पडता येईल ना? तेव्हा मनात शाश्वत नामच सुरू आहे ना, याचा विचार म्हणजेच मनात असार प्रपंचाचा विचार सुरू नाही ना, याचा तपास करणं आहे. या अर्थानं सारविचार या शब्दाचा अर्थ अंत:करणात नामस्मरण चालू आहे की नाही, हे पाहणं आहे. आता कुलकर्णी आणखी एक पाऊल पुढे टाकत म्हणतात की, अंत:करणात नामस्मरण चालू आहे की नाही याबरोबरच त्या नामाची प्रचीती आहे की नाही, हे पाहत राहणं हाच सार विचार आहे! आता नामाची प्रचीती म्हणजे नेमकं काय हो? खरी प्रचीती शब्दातीतच असली पाहिजे, पण आता समर्थ जो बोध करीत आहेत तो या वाटेवर पहिली पावलं टाकत असलेल्या साधकाला आहे, हे लक्षात घेतलं तर अशा साधकासाठीची प्रचीती काय असेल? तर अंत:करणात सुरू असलेल्या नामानं जगातलं अडकणं कमी होत आहे का? जगाची ओढ वाटणं कमी होत आहे का, हीच या पायरीवरची नामाची प्रचीती असली पाहिजे. निदान ही ओढ कमी झाली नसली, अडकणं थांबलं नसलं तरी त्या अडकण्याची, त्या ओढीची आणि त्यापायी आपला वेळ आणि शक्ती कशी वाया जात आहे, याची जाणीव तरी प्रथमच होऊ लागली ही काय कमी महत्त्वाची प्रचीती आहे?
–चैतन्य प्रेम