News Flash

१०९. अधोमुख

स्थलमर्यादेमुळे कुंडलिनी शक्ती, सात चक्रं या विषयांच्या खोलात जाणं आपण टाळणार आहोत.

 

 

स्थलमर्यादेमुळे कुंडलिनी शक्ती, सात चक्रं या विषयांच्या खोलात जाणं आपण टाळणार आहोत. ‘अभंगधारा’ या सदरात ‘पैल तो गे काऊ’ या माउलींच्या अभंगाच्या अनुषंगानं या विषयाचा आध्यात्मिक, यौगिक आणि वैद्यकीय अंगानं विस्तृत मागोवा घेतला होता. त्यातील तपशील संक्षेपानं प्रथम पाहू. ‘अभंगधारा’त नमूद होतं की, ‘‘प्रत्येक माणसात प्राणशक्ती आहे. याच प्राणशक्तीच्या जोरावर त्याचा सर्व जीवनव्यवहार सुरू असतो. माणसाला लाभलेला देह म्हणजे एक अद्भुत असं स्वयंचलित उपकरणच आहे. या शरीराच्या मेरुदंडात म्हणजे पाठीच्या कण्यात इडा व पिंगला हे ज्ञानतंतूंचे दोन प्रवाह असून मेरुदंडातील मज्जेच्या मध्यातून जाणारा सुषुम्ना नामक पोकळ मार्ग आहे. या पोकळ मार्गाच्या खालच्या टोकाशी कुंडलिनीशक्तीचं निवासस्थान आहे. त्या ठिकाणी कुंडलिनी शक्ती वेटोळं घालून बसली आहे. प्रत्येक माणसात ही सुषुम्ना आहे, पण त्याचा सर्व व्यवहार हा इडा आणि पिंगला या दोन नाडय़ांद्वारे अव्याहत चालतो. ज्ञानतंतूंच्या या दोन प्रवाहांद्वारे प्रत्येक इंद्रियांमार्फत मेंदूपर्यंत संवेदना पोहोचवल्या जातात आणि कोणती कृती करायची हे मेंदूकडून प्रत्येक इंद्रियाला तात्काळ प्रेरित केले जाते. इडा आणि पिंगला अत्यंत सक्रीय आहेत आणि त्याद्वारेच शरीरात प्राणाचा प्रवाह अखंड आहे. त्याद्वारेच जिवाला बाह्य़चेतना होते, संवेदना होते आणि तो कार्यरत असतो. सुषुम्ना मात्र बंद आहे. गुरुकृपेनं जेव्हा गतिमान झालेली प्राणशक्ती हे बंद द्वार उघडायचा प्रयत्न करते आणि प्राण उध्र्वमुख होऊन सुषुम्नेत जाण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी मार्गावर अडथळे येतात. पण त्या प्राणशक्तीत, त्या कुंडलिनीशक्तीतच अशी शक्ती अंतर्भूत असते की तो अडथळा ती पार करून पुढे जाते. त्यासाठी साधनाभ्यासाची मात्र जोड हवी. हा अडथळा नष्ट करून पुढे जाण्याची जी क्रिया आहे तीच ‘चक्रां’मागची भूमिका आहे.’’ आता जेव्हा ही कुंडलिनी शक्ती सगुरुकृपेनं जागी होऊन या सुषुम्नेच्या मार्गानं थेट उध्र्वगामी होते तेव्हाच माणूस जगत असतानाच मुक्त होतो. आता ज्या चरणाच्या अनुषंगानं आपण ‘अधोमूख’ या शब्दाचा विचार करीत आहोत, त्यानुसार, हे अशा साधकाच्या मनोदशेच चित्रण आहे ज्याला सत्य उमगल्याचं भासत आहे, पण त्याच्या जगण्यातलं असत्यही सुटलेलं नाही, स्वबळावर विकार, वासना, वृत्तींचा निरोध अर्थात नियमन करण्याची धडपडही सुरू आहे, पण अंतर्मनाच्या गर्भात दडपलेलं वासनेचं बीज काही नष्ट झालेलं नाही. असं असलं तरी शाश्वत आत्मसुखाच्या प्राप्तीसाठी क्षीण का होईना त्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या तोडक्यामोडक्या साधनेनंही आंतरिक आध्यात्मिक शक्ती क्षीण का होईना, पण जागी होऊ लागते. ही जी शक्ती आहे ती उध्र्वगामी झाली तर जगण्यातला संकुचितपणा सुटत जातो, जगणं व्यापक होऊ लागतं. उच्च आध्यात्मिक ध्येयाकडे वेगानं वाटचाल होऊ लागते. हीच शक्ती अधोगामी झाली तर मात्र जगणं अधिक संकुचित होऊ लागतं, वासना-विकारांत मन अधिकच गुंतत जातं, मुखानं उच्च तात्त्विक चर्चा करणारा साधक प्रत्यक्षात हीन पातळीवरच घसरत असतो. अधोगामी होण्याचा हा धोका साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर आहे. सापशिडीच्या खेळात नाही का? अगदी शेवटच्या घराजवळ पोहोचूनही एकदम घसरण होऊन पहिल्या घरात आपण फेकले जाऊ शकतो. अगदी त्याचप्रमाणे कितीही आध्यात्मिक प्रगती झाली तरी अखेरच्या टप्प्यावरही घसरणीचा धोका आहे. तेव्हा ही स्थिती टाळायची असेल तर सद्गुरूंच्या बोधानुरूपच जीवनव्यवहार होत गेला पाहिजे, त्यांच्या सांगण्यानुसारच साधना झाली पाहिजे. मनोबोधाचे पुढचे श्लोक सद्गुरूकडेच वळवणारे आहेत.

-चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2016 4:26 am

Web Title: mauli abhang philosophy
Next Stories
1 १०८. मायपोटी
2 १०७. जन्मदु:ख!
3 १०६. कल्पनांचे काटे
Just Now!
X