News Flash

४१. षट्विकारदर्शन : १

संकल्प आणि विकल्पाची चर्चा सुरू असतानाच एका साधकानं श्रीगोंदवलेकर महाराज

संकल्प आणि विकल्पाची चर्चा सुरू असतानाच एका साधकानं श्रीगोंदवलेकर महाराज यांनी ‘मानसपूजा’ या स्तोत्रातील रूपकाची आठवण करून दिली. श्रीरामचंद्रांची मानसपूजा कशी करायची, हे श्रीमहाराजांनी त्यात सांगितलं आहे आणि त्यातली एक ओवी अशी आहे : ‘‘इंद्रियांचा तांबूल जाण। षड्रीपूंची दक्षिणा सुवर्ण। संकल्प विकल्प धनुष्यबाण। रामाहाती दिधला।।’’ इथे धनुष्य जसा हातातच राहातो, तसा संकल्प दृढ धरावा आणि बाण जसा सोडून दिला जातो तसा विकल्प सोडून द्यावा, असा अर्थ काहीजणांना वाटतो. प्रत्यक्षात तसा अर्थ वाटत नाही. याचं कारण रामाचा बाण हासुद्धा लक्ष्यावरच असायचा. बाण हातातून नुसता सोडून दिला जात नाही, तो लक्ष्यावरच सोडला जातो. मग इथे काय अर्थ असावा? तर इंद्रियांच्या योगानं विषयरसाची जी गोडी लागली आहे ती आणि षट्रीपूंची म्हणजे काम, क्रोध, लोभ-मोह, मद, मत्सर, दंभ यांची सुवर्ण दक्षिणा रामाला अर्पण करावी. आता सहा विकारांना सोनं का म्हंटलंय? तर हेच विकार भगवंताकडेही वळवता येतात म्हणून! केवळ भगवंताची कामना धरावी (काम), साधनेसाठी समर्पण होत नसल्याचा खेद असावा (क्रोध), उपासनेची ओढ असावी व तिच्याशिवाय अन्य कशाचा प्रभाव मनावर नसावा (लोभ व मोह).. आता मद आणि मत्सराचं रूपांतर फार सूक्ष्म आहे. ‘मी कोण आहे’ याचा मद उरू नये, तर ‘मी कुणाचा आहे’ या जाणिवेनं सर्व गोष्टींमधलं गुंतणं तुच्छवत् वाटावं हा रूपांतरित मद आहे आणि प्रभूंचे किती अनन्य भक्त होऊन गेले, मी तसा का होत नाही, हे ‘तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो,’ असं मत्सराचं रूपांतर व्हावं. तर असे रूपांतरित, जणू विरक्तीच्या अग्नीनं झळालेलं सुवर्ण दक्षिणा म्हणून द्यायचं आहे. मग काय म्हणतात? तर आजवर भौतिक संकल्पाचं धनुष्य आणि त्यांच्या पूर्तीसाठी धडपडतानाच विफल ठरणारे विकल्पवत बाण, हे दोन्हीही प्रभूंनाच अर्पण करावं आणि प्रभूंच्या हातीच धनुष्य-बाण द्यावा, कर्तेपणा द्यावा! मग माझ्या विकल्पांवर तेच बाण सोडतील! श्रीमहाराजांच्या ‘मानसपूजे’तील हे चरण आपल्या पुढील चर्चेला अधिक प्रवाहित करणारे आहेत कारण सहाव्या श्लोकाच्या निमित्तानं ‘षट्विकारदर्शना’चा प्रारंभ होत आहे! हे सहा विकार आपण आधीच पाहिले ते म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि दंभ. त्यांचा उल्लेख पुढील सहाव्या श्लोकांत आहे. हा श्लोक असा :
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नानाविकारी।।
नको रे मना सर्वथा अंगिकारूं।
नको रे मना मत्सरू दंभभारू।। ६।।
आता हा श्लोक वाचला तर वाटेल की यात केवळ काम, क्रोध आणि मत्सर यांचाच स्पष्ट उल्लेख आहे. पण तसं नाही, लोभ आणि मोह हे कामनेतूनच उत्पन्न होत असल्याने त्यांचा संकेत ‘काम नानाविकारी’ या शब्दांत आहे आणि ‘नको रे मना सर्वथा अंगिकारूं।’ हा जो तिसरा चरण आहे, तो प्रत्यक्षात ‘नको रे मदा सर्वथा अंगिकारूं।’ असा असला पाहिजे. तेव्हा या श्लोकाचा सर्वसाधारण अर्थ असा की, ‘‘हे मना, काम म्हणजे कामना या घातक विकारांतूनच क्रोध, लोभ, मोह आदी नानाविकार उत्पन्न होतात. क्रोध हा अखेरीस खेदच उत्पन्न करतो. त्यामुळे या काम, क्रोध, लोभ, मोहाचा त्याग कर. मद म्हणजे अहंभावानं जगणं सोडून दे. तो मद अंगिकारू नकोस, म्हणजेच तुझ्या अंगात तो साकारू देऊ नकोस. दुसऱ्याविषयी तुच्छता आणि स्वत:विषयी अवास्तव दंभभाव जोपासणाऱ्या मत्सराचाही त्याग कर.’’ आता या श्लोकाचा सार्वत्रिक अर्थ आणि मननार्थ यात भेद नाही. तरी त्याचं मनन मात्र आवश्यक आहे! तिकडे आता वळू.

 

-चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2016 3:32 am

Web Title: ramdas swami philosophy 9
टॅग : Ramdas Swami
Next Stories
1 ४०. चोरपावलं..
2 ३९. अखंड सावधानता..
3 ३८. संकल्प आणि कल्पना : ४
Just Now!
X