News Flash

२२१. ऋण

सर्वोत्तमाचा दास होणं काही सोपं नाही!

श्रीसमर्थ रामदास ‘मनोबोधा’च्या अर्थात मनाच्या श्लोकांतील ५५व्या श्लोकात श्रीसद्गुरूंची विरक्त वृत्ती तरीही निजजनांबद्दल असलेली त्यांची कळकळ आणि परमात्म्याचा त्यांच्याबाबत असलेला ऋणी भाव स्पष्टपणे मांडतात. हा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू आणि मग मननार्थाकडे वळू.  श्लोक असा:

नसे मानसीं नष्ट आशा दुराशा।

वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा।

ऋणी देव हा भक्तिभावें जयाचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा।। ५।।

प्रचलित अर्थ : त्याच्या मनात स्वार्थाची क्षुद्र आशा नसते. त्याला भगवंताच्या प्रेमाची तहान लागली असते. त्याच्या भक्तिभावाला भुलून देवही त्याचा ऋणी होतो. सर्वोत्तमाचा हा दास जगात धन्य होतो.

आता मननार्थाकडे वळू. सर्वोत्तमाचा दास होणं काही सोपं नाही! मनोबोधाच्या ४७व्या श्लोकापासून समर्थ हे दास्य कशानं अंत:करणात रुजेल, हेच सांगत आहेत. आत-बाहेर परमभावच जोपासा (मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहें), आपण जगाच्या नव्हे तर हे जग ज्यापासून उत्पन्न झालं त्या परमतत्त्वाच्या भक्तीसाठी अर्थात परमार्थासाठीच जन्माला आलो आहोत, हे भान जगात वावरताना सुटू देऊ नका (जनीं जाणता भक्त होऊनि राहें/ चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा), सत्त्वगुणावर प्रेम राखा, पण सत्त्वगुणही अखेर पुण्यसंचयच घडवतो आणि पापाइतकंच पुण्यही कर्मफळ निर्माण करणारं आणि म्हणूनच गुंतवणारं असतं त्यामुळे सत्त्वगुणाच्याही पलीकडे गेलं पाहिजे हे जाणून त्यासाठी साधनाचा क्रम सुटू देऊ नका (गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा), संकुचित भावातून सुटून व्यापक भावाशी एकरूप करणारी साधना, सद्गुरू बोधानुरूप आचरण हाच साधकाचा खरा धर्म आहे. ते धर्माचरण करताना देह सत्कार्यात आणि अंत:करण सत्चिंतनात तर वाचाही सत्याच्या उच्चारात गुंतवा (सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा। सदा रामनामें वदे नित्य वाचा। स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा / सदा बोलणें नम्र वाचा सुवाचा / न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा।) यावर या श्लोकांमध्ये समर्थानी भर दिला. एवढंच नाही तर श्रीसद्गुरूही हे कसं आचरून दाखवतात, तेही मांडलं. आता ५५वा श्लोक हा त्यांच्या माहात्म्य वर्णनाचा कळस आहे. कारण भगवंत त्यांचा ऋणी आहे, हे सत्य या श्लोकात उघडपणे सांगितलं आहे! हा भगवंत का ऋणी असावा?  ‘पूर्ण-अपूर्ण’ या गुरूगीतेवरील सदरात याचा ऊहापोह झाला आहेच. संक्षेपानं ते पुन्हा थोडं जाणून घेऊ. जगाच्या उत्त्पत्तीपासूनच भगवंताच्या मर्यादाही स्पष्ट आहेत. इच्छा असणं हे अपुरेपणाचं लक्षण आहे, असं शास्त्र सांगतं. हे विश्व निर्माण झालं ते परमात्म्याच्या इच्छेतून! आनंद कारणावर अवलंबून असणं, हेदेखील अपुरेपणाचं लक्षण आहे. आनंद भोगण्यासाठी दोन व्हावं, अशी भगवंताला इच्छा झाली आणि त्या इच्छेतून हे जग निर्माण झालं. भगवंत आनंदनिधान असूनही हे जग मात्र सुख-दु:ख मिश्रित झालं. उत्पत्ती झाल्यापासून जग विस्तारतच आहे आणि जगाचा हा पसारा पुन्हा आपल्यात विलीन करून घेणं भगवंताला साधत नाही! हा पसारा आवरण्याचं काम सद्गुरू करीत आहेत. स्थूलात जेवढा पसारा असतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पसारा सूक्ष्मात असतो. ‘आपलं घर असावं,’ या इच्छेतून माणूस अनंत धडपडीनंतर घर घेतो, पण त्याच्या मनात मात्र असंख्य घरं नांदत असतात. तेव्हा मनातला हा पसारा आवरणंही अनिवार्य असतं. ‘हे सारं परमात्म्याचं आहे,’ ही जाणीव रुजवून सद्गुरू हा पसारा आवरायलाच सुरुवात करतात. माझ्या सद्गुरूंनी म्हटलं आहे-

खुदा से खुदी को किया दूर हमने

खुदा की खुदाई पराई हुई है।

खुदा में खुदी को अगर लीन कर दे

खुदा से खुदी की जुदाई नहीं है।।

चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 2:17 am

Web Title: samarth ramdas philosophy 122
Next Stories
1 २२०. अचळ निश्चय
2 २१९. तारुण्यकाळ : २
3 २१८. तारुण्यकाळ : १
Just Now!
X