News Flash

२२६. वज्र-कुसुम : २

एकदा श्रीसद्गुरू असेच क्रोधायमान होऊन परगावाहून आलेल्या शिष्याशी बोलत होते.

अंत:करणातील कामनांच्या पूर्तीमध्ये अडथळा येतो तेव्हा आपल्या अंत:करणात क्रोध उसळतो. सद्गुरूंच्या अंत:करणात आपल्यासारखी देहबुद्धीची कामनाच उद्भवत नाही, मग क्रोध कुठून यावा? पण तरीही ते क्रोधरूप धारण करतातही, पण त्यांच्या त्या क्रोधावतारात आणि आपल्या क्रोधायमान होण्यात पूर्ण भेद असतो. क्रोध उत्पन्न होताच आपण त्याच्या पूर्ण आहारी जातो, त्याच्या पूर्ण ताब्यात जातो. श्रीसद्गुरूंच्या चेहऱ्यावर क्रोध दिसला तरी क्रोध त्यांच्या पूर्ण ताब्यात असतो. एकदा श्रीसद्गुरू असेच क्रोधायमान होऊन परगावाहून आलेल्या शिष्याशी बोलत होते. मी अंगणातच थोडय़ा दूरवर एका झाडाखाली उभा होतो. माझ्या मनात व्यवहारातील एका गोष्टीबद्दल शंका होती. म्हणजे ती गोष्ट करावी की करू नये, असा प्रश्न पडला होता. तोच त्या क्रोधित अवस्थेत श्रीसद्गुरू मी उभा होतो तिथे तुळस काढायला म्हणून आले. मी मनातला प्रश्न त्यांना विचारला. एकदम अत्यंत शांत चेहऱ्यानं ते म्हणाले, ‘‘मी आता क्रोधात आहे, मला नंतर विचार!’’ आता जे इतक्या शांतपणानं ‘मी आता रागात आहे,’ असं सांगू शकतात, ते क्रोधायमान कसे असतील? श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रातलाही एक प्रसंग आहे. श्री महाराजांचे नातेवाईक त्यांच्याकडे कधी कधी येत असत. श्रीमहाराज आता साधूच झाले आहेत, मग एवढी शेती त्यांना काय करायची आहे? ती त्यांनी आमच्यात वाटून टाकावी, असं त्यांचं म्हणणं असे. स्वार्थाचं अध्यात्म लोकांना कळतं ते असं! तर महाराज ठाम नकार देत. मग जोरदार भांडण व्हायचं. अखेर महाराज क्रोधावतार आटोपून प्रेमावतार धारण करीत आणि त्यांना आग्रहानं जेवायला बसवीत. श्रींचे अनन्यभक्त भाऊसाहेब केतकर यांच्यासमोर एकदा प्रथमच असं भांडण झालं. भाऊसाहेबांना वाटलं की, खरे साधू असून यांना एवढा राग का? तोच महाराज भाऊसाहेबांकडे वळून पटकन आणि अगदी शांतपणे म्हणाले, ‘‘भाऊसाहेब, हा राग गळ्याच्या वर आहे बरं का!’’ म्हणून समर्थ म्हणतात, तया अंतरी क्रोध संताप कैचा? मग हा क्रोध ते का आणि केव्हा धारण करतात? तर साधकाकडून जी चूक भ्रम आणि मोहासक्तीतून घडली आहे आणि जी त्याच्या आंतरिक वाटचालीत अडसर बनणारी आहे, ती वारंवार सांगूनही त्यानं पुन्हा केली, तर तेव्हाच ते क्रोध धारण करतात. त्या क्षणीही निष्कपट मनानं साधकानं आपली चूक मान्य केली आणि ती पुन्हा घडू नये, अशी प्रामाणिक इच्छा त्याच्या मनात उद्भवली तर हा ‘क्रोध’ तात्काळ ओसरतो. बरेचदा होतं मात्र वेगळंच. साधक आपली चूक मान्यच करीत नाही किंवा वेगवेगळी कारणं पुढे करायचा प्रयत्न करतो. आपल्या मोहासक्तीवर पांघरूण घालायचा प्रयत्न करतो. त्या वेळी हा क्रोध अधिकच व्यक्त होतो. तसंच अध्यात्माच्या नावावर मी दंभ, पाखंड पोसत असेन तरी ते क्रोधित होतात. खरं पाहता त्यांचं प्रेम आणि त्यांचा क्रोध यांचा अंतिम हेतू साधकाचं आत्महित साधणं हाच असतो. जो दीनांचा दयाळू आहे, मनाचा मवाळू आहे, जो दयासिंधू, कृपासिंधू आहे, ज्याच्या स्नेहाद्र्रतेचा पार लागत नाही त्याच्या प्रेमाची व्याप्ती काय वर्णावी? गोंदवलेकर महाराज तर म्हणत ना, ‘ माझ्यातलं प्रेम काढलंत तर मी उरतच नाही!’ तर अशा प्रेमस्वरूप सद्गुरूंच्या अंतरंगात क्रोध कुठला? जो क्रोधाचा आविर्भाव असतो तो साधकावरील प्रेमाच्याच कळवळ्यातूनच होतो. ऐसी कळवळ्याची जाती लाभाविण करी प्रीती!  सत्पुरुषांची जात केवळ प्रेमाची असते. त्या प्रेमातूनच त्यांना जीवाचं दु:ख पाहवत नाही. ते दु:ख दूर करण्यासाठीच ते त्याला बोध करतात. समर्थाच्या मनोबोधातील सद्गुरू चरित्राचे दहा श्लोक संपले. आता ते ज्या उपासनेचा बोध करतात, तो सांगणाऱ्या श्लोकांकडे म्हणजेच मनोबोधाच्या गाभ्याकडे वळू.

चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 3:13 am

Web Title: samarth ramdas philosophy 128
Next Stories
1 २२५. वज्र-कुसुम : १
2 २२४. तहान प्रेमाची..
3 २२३. रेघ.. लहान, मोठी!
Just Now!
X